तुकडेबंदी मुक्त दस्तनोंदणीला सुरुवात, नागरिकांसाठी नवे नियम काय? वाचा सविस्तर!
Agriculture News : राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून एक ते दोन गुंठे यांसारख्या लहान भूखंडांच्या दस्तनोंदणीचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानुसार, १९६५ ते २०२४ मधील सर्व व्यवहार अधिमूल्य शुल्काशिवाय नियमित केले जाणारय.

तुकडेबंदी मुक्त दस्तनोंदणीला सुरुवात
पुणे : राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करून दीर्घ प्रतिक्षेला पूर्णविराम दिला आहे. आता एक ते दोन गुंठे यांसारख्या लहान भूखंडांच्या खरेदी-विक्रीसाठी अधिकृत मार्ग खुले झाले असून, नागरिकांना अडथळा ठरत असलेला मोठा प्रश्न अखेर सुटला आहे.
अंमलबजावणीला सुरुवात
सुधारीत तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी मंगळवारपासून (2 डिसेंबर) राज्यभर सुरू झाली असून नोंदणी विभागाने यासंदर्भातील प्रक्रिया अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेले हजारो दस्त मार्गी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
1965 ते 2024 मधील सर्व व्यवहार नियमित
नव्या कार्यपद्धतीनुसार, 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या दरम्यान झालेल्या सर्व तुकडेबंदी व्यवहारांना शासन नियमित करणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी पूर्वी आकारला जाणारा अधिमूल्य शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अंदाजे 50 लाखांहून अधिक अडकलेले जमीन व्यवहार सुटणार असून हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नव्या दस्तनोंदणी प्रक्रियेतील महत्त्वाचे नियम
नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व सहजिल्हा निबंधकांना दिलेल्या सूचनांनुसार, तुकडेबंदी संबंधित दस्तनोंदणी करताना खरेदीदार व विक्रेत्यांना प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये पुढील बाबी स्पष्ट कराव्या लागतील.
संबंधित जमीन यापूर्वी कोणालाही कोणत्याही प्रकारे हस्तांतरित केलेली नाही.
दस्तनोंदणीसाठी सादर केलेला सातबारा उतारा व इतर सर्व कागदपत्रे खरी आहेत.
ही नवी व्यवस्था व्यवहारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
कुठल्या क्षेत्रांमध्ये तुकडेबंदी कायदा लागू राहणार नाही?
शासनाच्या नव्या अधिसूचनेनुसार खालील क्षेत्रांमध्ये तुकडेबंदीचे बंधन लागू राहणार नाही.
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दी
विकास प्राधिकरण (Development Authority) व प्रादेशिक आराखडा (RP) क्षेत्रातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक किंवा इतर अकृषिक झोन
गावाच्या हद्दीपासून 200 मीटरपर्यंतचा परिसर
या भागांत जमीनविक्रीसाठी कोणतीही तुकडेबंदी मर्यादा राहणार नाही. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील लहान भूखंडांच्या व्यवहारांना मोठा वेग मिळण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी मोठा दिलासा
सुधारित कायद्यामुळे खालील महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत.
अनेक वर्षे प्रलंबित असलेले दस्तनोंदणी व्यवहार पूर्ण होणार
भूमिधारकांवरील अधिमूल्याचे ओझे हटणार
लहान जमिनींच्या खरेदी-विक्रीला प्रोत्साहन मिळणार
अडकलेली मालमत्ता अधिकृतपणे मालकांच्या नावावर नोंदवली जाणार
ग्रामीण व शहरी दोन्ही भागांतील जमीन व्यवहार सुलभ होणार
एकूणच, या निर्णयामुळे जमीन व्यवहारातील गुंतागुंत मोठ्या प्रमाणात कमी होणार असून लाखो नागरिकांसाठी नवीन मार्ग खुला झाला आहे.

