Tipu Sultan Controversy : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान संदर्भातील विधानामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला. मालेगावातील तसबिरीपासून सुरू झालेला वाद हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे चिघळला. 

Tipu Sultan Controversy : राज्यात आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. Harshvardhan Sapkal यांच्या विधानानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला असून, या प्रकरणात आता Manoj Jarange Patil यांनीही उडी घेत जहरी टीका केली आहे.

मालेगावातून वादाची ठिणगी

वादाची सुरुवात मालेगाव येथून झाली. येथील महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची तसबीर लावण्यात आली होती. इतर कोणत्याही महापुरुषांचा फोटो नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. वाढता तणाव पाहता ती तसबीर तत्काळ हटवण्यात आली; मात्र त्यानंतरही वाद शमला नाही.

सपकाळांचे वक्तव्य आणि राजकीय प्रतिक्रिया

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. भाजप आणि इतर संघटनांनी यावर जोरदार आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन छेडले. काही ठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या. वाढता तणाव लक्षात घेता सपकाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली.

मनोज जरांगे यांची कडवी प्रतिक्रिया

या वादात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेत सपकाळांवर सडकून टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी राजकारणासाठी अशा विधानांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. “महाराजांची बरोबरी जगात कुणी करू शकत नाही,” असेही ते म्हणाले.