Shiv Jayanti 2026 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर भव्य सजावट आणि शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. 

Shiv Jayanti 2026 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणुका आणि अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथे विशेष आकर्षक सजावट करण्यात आली असून हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

शिवनेरीवर पुष्पसजावट आणि रोषणाई

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर भव्य सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. शिवजन्म स्थळाच्या आतील भागालाही पारंपरिक आणि ऐतिहासिक स्वरूप देण्यात आले आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला असून सकाळपासूनच शिवभक्तांनी नतमस्तक होण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

शासकीय कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती

शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

राज्यभरात उत्सवी वातावरण

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारा दिवस म्हणून साजरा केला जात आहे.