- Home
- Maharashtra
- ST Workers Protest 2025: एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सोमवारपासून सुरू; वाहतूक सेवेला फटका बसणार? जाणून घ्या ताजं अपडेट
ST Workers Protest 2025: एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सोमवारपासून सुरू; वाहतूक सेवेला फटका बसणार? जाणून घ्या ताजं अपडेट
ST Workers Protest 2025: एसटी महामंडळाचे कर्मचारी प्रलंबित वेतन आणि ४००० कोटींच्या थकबाकीसाठी सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. सरकारने बैठक रद्द केल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता असून, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.

लालपरीचं चाकं थांबणार?
ST Workers Protest 2025: एसटी महामंडळातील कर्मचारी १३ ऑक्टोबर सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. आपले प्रलंबित वेतन, भत्ते आणि अन्य आर्थिक मागण्या न भागवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४००० कोटींच्या थकीत रकमेवरून आंदोलन उफाळलं
एसटीमधील विविध १८ कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी थकीत वेतन व इतर आर्थिक मागण्यांसाठी सरकारला नोटीस दिली होती. सुमारे ४००० कोटी रुपयांची थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात आला आहे.
राजकीय बैठकीची अचानक रद्दी; आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी संबंधित विषयावर बैठक बोलावली होती. परंतु राजकीय कारणांमुळे बैठक रद्द करण्यात आली. यामुळे संघटनांमध्ये नाराजी पसरली असून, आंदोलन आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.
आझाद मैदानावर ठिय्या आंदोलनाचा निर्धार
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीसह अन्य दोन प्रमुख संघटनांनी आंदोलनाची नोटीस दिली असून, आंदोलन आझाद मैदानावर होणार आहे. यामध्ये १६ प्रमुख संघटना व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांचा सहभाग आहे.
संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी स्पष्ट केले की, “सोमवारचं आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं असून, त्याचा एसटीच्या वाहतुकीवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र सरकारने जर वेळीच निर्णय घेतला नाही, तर पुढील आंदोलन बेमुदत ठिय्या आंदोलन असेल.”
दिवाळी आणि शाळांच्या सुट्ट्या डोळ्यांसमोर, प्रवाशांच्या गैरसोयीची शक्यता
दिवाळी जवळ आल्याने आणि लवकरच शाळांना सुट्ट्या लागणार असल्याने एसटी प्रवाशांची संख्या वाढणार आहे. अशा वेळी आंदोलन तीव्र झाल्यास वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
मुख्य मागण्या काय आहेत?
२०१८ पासूनचा महागाई भत्ता फरक अद्याप अपूर्ण
२०२०-२४ पर्यंतच्या वेतनवाढीचा फरक थकीत
इतर विविध भत्ते, सुविधा थांबवण्यात आल्या
एकूण थकीत रक्कम ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त
कर्मचाऱ्यांच्या मते, ही रक्कम एकवेळ आर्थिक मदत म्हणून सरकारने एसटी महामंडळाला त्वरित द्यावी, म्हणजे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील.

