महाराष्ट्र विधानभवनात मराठी भाषेला स्थान न मिळाल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लोकप्रतिनिधींना 'षंढ' असे संबोधले. या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात सध्या मोठा गदारोळ सुरू झाला आहे. विधान भवनात मराठी भाषेला डावलल्याने संतप्त झालेल्या देशपांडेंनी थेट विधिमंडळातील लोकप्रतिनिधींना 'षंढ' असे संबोधले. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. मात्र, देशपांडे आपल्या भूमिकेवर ठाम असून, मराठी भाषेसाठी तुरुंगात जाण्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
संसदेच्या अंदाज समितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विधान भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाच्या मंचावर लावण्यात आलेल्या फलकावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत मजकूर होता. महाराष्ट्राच्या विधान भवनात आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेला स्थान न मिळाल्याने अनेक स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. याच संतापातून संदीप देशपांडेंनी "विधान भवनात सर्व षंढ बसले आहेत," असे अत्यंत कठोर विधान केले.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
"हेच दुर्दैव आहे. सगळे षंढ लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय?" असे म्हणत देशपांडेंनी आपला संताप व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला, तर इतर मंत्री आणि नेत्यांनीही याचा निषेध केला. तरीही देशपांडे आपल्या शब्दांवर ठाम राहिले. ते म्हणाले, "माझा शब्द झोंबला असेल तर त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे हक्कभंगाचा विषय असेल तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या माझ्यावर जेलमध्ये जायची वेळ आली तर मी मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायला तयार आहे."
मंत्री गुलाबराव पाटील यांनी देशपांडेंच्या विधानाचा केला निषेध
मंत्री गुलाबराव पाटील यांनी देशपांडेंच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. "विधिमंडळ हे महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहात बसणाऱ्या सभासदांना षंढ म्हणणे हे संस्कृतीला शोभणारे नाही. हा सभागृहाचा अपमान आहे. आगामी काळात बरेच आमदार त्यांच्या वक्तव्यावर हक्कभंग आणल्याशिवाय राहणार नाहीत," असा इशारा त्यांनी दिला.
'हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकला आहे' : आमदार सुधीर मुनगंटीवार
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. "या संदर्भात हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकला आहे. कारण कुठल्याही विधिमंडळाच्या कामकाजांबाबत भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उल्लेख करतो त्यांनाही देवाने तोंड दिलं आहे. त्यांच्याही डिक्शनरीत अशाप्रकारचे शब्द असू शकतात," असे मुनगंटीवार म्हणाले.
'यांचं 'षंढ' म्हणणं ठीक नाही. पण त्यांचं म्हणणं योग्य आहे' : शिवसेनेचे नेते रामदास कदम
दरम्यान, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देशपांडेंच्या वक्तव्यातील भाषेवर आक्षेप घेतला, पण त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. "संदीप देशपांडे यांचं 'षंढ' म्हणणं ठीक नाही. पण त्यांचं म्हणणं योग्य आहे. कारण महाराष्ट्रात मराठीचा कायदा झाला. न्यायालयाने मराठीचे आदेश दिले. असं असताना मंत्रालयात किंवा विधान भवनात हिंदी आणि इंग्रजी बोर्ड लावणे हे आम्हाला शोभणारे निश्चित नाही," असे कदम म्हणाले.
‘…तेव्हा सर्वात मोठा बोर्ड हा मराठीचा असतो’ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले. "लोकसभेने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा सर्वात मोठा बोर्ड हा मराठीचा असतो," असे शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणामुळे मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, येत्या काळात यावर आणखी राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


