लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत १५ पैकी ११ जागांवर काँग्रेसप्रणित सहकार पॅनलचे उमेदवार विजयी होऊन देशमुखांचे वर्चस्व कायम राहिले

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर देशमुख यांचं वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे. लातूर जिल्हा मध्यावरती बँकेवर 15 पैकी 11 जागांवर काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महायुती प्रणित छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. गेल्या काही वर्षात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक न झाल्याने या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल हाती येताच विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

सहकारात नवीन पर्व सुरू झालं असून मतदारांनी कामाला उत्तर दिलं आहे. पुढेही एकोप्याने काम करू अशी प्रतिक्रिया माजी आमदार धीरज देशमुख यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी याविरोधात प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल भ्रष्टाचारच्या देशमुखांच्या एकाधिकारशाही विरोधात असल्याची प्रतिक्रिया अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. ते महायुती प्रणित छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलकडून विजयी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलला अवघ्या 4 जागा मिळाल्या आहेत.