महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर नागपूर येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयावर धडक छापा टाकला. या कारवाईत रजिस्ट्रीमध्ये अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळून आली.
नागपूर: महसूल विभागात कायमच भ्रष्टाचार सुरु असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत असतं. आता हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी महसूलमंत्र्यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी नागपूर येथील सहदुय्यम निबंधक कार्यलयातच धडक छापा मारला आहे. यावेळी त्यांनी रजिस्ट्रीमध्ये अनियमितता आढळून आली आणि काही अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळून आले आहेत.
एका रजिस्ट्रीमागे किती कमिशन घेत होते?
एका रजिस्ट्रीमागे अधिकाऱ्यांकडून तब्बल ५ ते ८ हजारांचे कमिशन मागितले जात होते. याबाबतच्या तक्रारी मंत्री बावनकुळे यांना मिळाल्या होत्या. त्यामुळं त्यांनी धडक कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापा मारला. कोतवालनगर येथील कार्यालयात रजिस्ट्री करताना पैसे मागितले जातात असं नागरिकांकडून सांगण्यात येत होतं.
छापा टाकून अधिकाऱ्यांना फोडला घाम
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यामुळे त्यांनी संबंधित कार्यालयावर छापा मारला आहे. दस्त नियमित नसतानादेखील रजिस्ट्री लावल्या जातात, अशा तक्रारी बावनकुळे यांना मिळाल्या होत्या. यावेळी आल्यानंतर त्यांनी सहदुय्यम निबंधक अनिल कपले यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. मंत्र्यांनी ड्रॉवर उघडल्यानंतर काही रक्कम आढळली, याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
