रत्नागिरीमधील चिपळूण-कराड मार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात थार कार आणि रिक्षाची जोरदार धडक बसत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई : मुसळधार पावसात चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे ट्रक, रिक्षा आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री उशिरा दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अडीच वर्षीय चिमुरड्याचाही समावेश आहे.
अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, रिक्षा आणि थार गाडी एकमेकांना चुकवताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्या. या भीषण धडकेत रिक्षामधील लहान मुलासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर ट्रकला धडक बसल्याने थार चालकाचाही मृत्यू झाला. धडकेनंतर थार आणि रिक्षा दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.
सुसाट वेगातील थार
हरियाणा राज्यातील पासिंग असलेल्या थार गाडीतून एका मुलीला घेऊन चालक सुसाट वेगाने जात होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताच्या आधी ती मुलगी ‘मला वाचवा’ असे ओरडत होती. नंतर थार चालकाने त्या मुलीला रस्त्यात सोडले आणि तो पुढे निघाला. याच वेळी अपघात झाला. सुदैवाने ती मुलगी या अपघातातून सुखरूप बचावली.
मृतांची ओळख
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये शबाना मियां सय्यद (वय 50), हैदर नियाज सय्यद (वय 3 वर्ष 8 महिने), नियाज हुसेन सय्यद (वय 50), इब्राहिम इस्माईल लोणी (वय 60, रिक्षा चालक) अशी त्यांची नावे आहेत. हे चौघेही पिंपळी मोहल्ल्यातील असून, यामध्ये रिक्षा चालकाव्यतिरिक्त एका कुटुंबातील आई, वडील आणि लहान मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. थार गाडी चालकाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


