- Home
- Maharashtra
- रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल! 1 जानेवारी 2026 पासून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना किती धान्य मिळणार?
रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल! 1 जानेवारी 2026 पासून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना किती धान्य मिळणार?
Ration Distribution Rule Change : जानेवारी २०२६ पासून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वाटपात बदल होणारय. यात तांदूळ, गहू यांच्या प्रमाणात सुधारणा करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसार वितरण केले जाईल.

रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल!
मुंबई : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. हा बदल जानेवारी 2026 पासून लागू होणार असून, अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेंतर्गत मिळणाऱ्या तांदूळ-गहूच्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे.
काय आहे नवा निर्णय?
पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी 2026 पासून खालीलप्रमाणे धान्य वाटप केले जाणार आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारक (AAY)
प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ
15 किलो गहू
प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH)
प्रति सदस्य दरमहा 3 किलो तांदूळ
2 किलो गहू
हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसार करण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
आधी काय होते वितरण?
याआधी काही काळासाठी धान्य वितरणाच्या प्रमाणात तात्पुरता बदल करण्यात आला होता. त्या काळात
अंत्योदय लाभार्थ्यांना : 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू
प्राधान्य कुटुंबांना : प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू
या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले, मात्र गहू कमी झाला. यावर लाभार्थ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही भागांत तांदळाची जास्त मागणी असल्याने समाधान व्यक्त झाले, तर गहू कमी झाल्याने अनेक कुटुंबांना अडचणी आल्या.
डिसेंबर 2025 मध्ये बदल नाही
पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 महिन्यासाठी सध्याचेच वितरण प्रमाण कायम राहणार आहे. म्हणजे
अंत्योदय : 25 किलो तांदूळ + 10 किलो गहू
प्राधान्य कुटुंब : प्रति सदस्य 4 किलो तांदूळ + 1 किलो गहू
या महिन्यात कोणताही नवीन बदल लागू होणार नाही.
जानेवारीपासून काय काळजी घ्यावी?
जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित केलेले प्रमाण लागू होणार असल्याने, शिधापत्रिकाधारकांनी आपल्या कार्डवरील सदस्यसंख्या, धान्याचे प्रमाण आणि दुकानावर मिळणारे वाटप तपासणे आवश्यक आहे. रास्त दर दुकानांवर यानुसार नियोजन केले जाणार आहे.
गरीब कुटुंबांसाठी महत्त्वाचा निर्णय
राज्यातील गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी रेशन व्यवस्था जीवनावश्यक आहे. त्यामुळे धान्य वितरणात होणारे बदल त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात. जानेवारी 2026 पासून तांदूळ आणि गहू यामधील संतुलन पुन्हा साधले जाणार असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ उद्दिष्टांनुसार धान्य वाटप केले जाणार आहे.

