- Home
- Utility News
- नववर्षाची मोठी गुडन्यूज! 1 जानेवारीपासून CNG-PNG दरात कपात, सर्वसामान्यांच्या खिशाला मिळणार दिलासा
नववर्षाची मोठी गुडन्यूज! 1 जानेवारीपासून CNG-PNG दरात कपात, सर्वसामान्यांच्या खिशाला मिळणार दिलासा
CNG PNG Price Reduction 2026 : पेट्रोलियम, नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केल्यामुळे 1 जानेवारीपासून CNG, PNG गॅसच्या किमती कमी होणारय. यामुळे देशातील ग्राहकांना प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची दरकपात मिळण्याची शक्यताय.

1 जानेवारीपासून CNG-PNG दरात कपात
नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेट कोलमडत असताना, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे CNG आणि PNG गॅसच्या किमती 1 जानेवारी 2026 पासून कमी होणार आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचा मासिक खर्च थेट कमी होण्याची शक्यता आहे.
महागाईवर थेट आघात
पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, स्वयंपाक गॅसची महागाई आणि CNG चा खर्च यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी 2026 ची सुरुवात खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे. PNGRB कडून टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये सुधारणा (Rationalization) करण्यात आल्याने प्रति युनिट 2 ते 3 रुपयांची दरकपात होणार आहे.
काय बदल केला गेला आहे?
PNGRB चे सदस्य ए. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस वितरण प्रणाली अधिक सुलभ करण्यात आली आहे. यापूर्वी गॅसचे दर अंतरानुसार तीन वेगवेगळ्या झोनमध्ये विभागले जात होते, त्यामुळे काही भागांमध्ये दर अधिक होते. आता ही प्रणाली बदलून तीन झोनऐवजी फक्त दोन झोन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, देशभरातील सर्व CNG आणि घरगुती PNG ग्राहकांसाठी ‘झोन 1’ लागू केला जाणार आहे. पूर्वी झोन 1 साठीचा दर ₹80 ते ₹107 दरम्यान होता, तो आता थेट ₹54 निश्चित करण्यात आला आहे. याचा थेट फायदा ग्राहकांना किरकोळ दरांमध्ये जाणवेल.
कोणाला मिळणार थेट फायदा?
या निर्णयाचा लाभ देशातील 40 सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (CGD) कंपन्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 312 भौगोलिक क्षेत्रांतील ग्राहकांना होणार आहे.
वाहनचालक – CNG वाहनांचा इंधन खर्च कमी होईल
गृहिणी व कुटुंबे – PNG स्वस्त झाल्याने मासिक स्वयंपाकघर बजेट सुसह्य होईल
वाहतूक आणि उद्योग क्षेत्र – मालवाहतूक खर्च कमी होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सकारात्मक परिणाम संभवतो
कंपन्यांवर सरकारची कडक नजर
जरी टॅरिफ कमी करण्यात आला असला, तरी गॅस वितरण कंपन्या हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवतात की नाही, यावर सरकार बारकाईने लक्ष ठेवणार आहे. “ग्राहक आणि कंपन्या दोघांच्याही हिताचा समतोल साधणे आमचे उद्दिष्ट आहे. दरकपातीचा फायदा ग्राहकांना मिळतोय का, यावर सातत्याने देखरेख केली जाईल,” असे तिवारी यांनी स्पष्ट केले.
2026 – बचतीचं वर्ष ठरणार
गॅसवरील व्हॅटमध्ये कपात, परवाना प्रक्रिया सुलभ होणे आणि वेगाने विस्तारत असलेले गॅस पाईपलाईन नेटवर्क यामुळे देशभरात CNG-PNG चा वापर वाढत आहे. एकूणच पाहता, 2026 हे वर्ष सर्वसामान्यांच्या बचतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

