Ram Sutar Passes Away : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. स्टॅच्यू ऑफ युनिटीसह अनेक ऐतिहासिक शिल्पांचे निर्माते असलेल्या राम सुतार यांनी भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख दिली.
Ram Sutar Passes Away : भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून देणारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम वनजी सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात अपूरणीय अशी पोकळी निर्माण झाली आहे. जगभरातील २०० हून अधिक शिल्पांच्या माध्यमातून त्यांनी भारताची ओळख जागतिक पातळीवर पोहोचवली.
शिल्पकलेतील दिग्गजाचा अस्त
राम सुतार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी शिल्पांची निर्मिती केली. दिल्लीतील संसद भवन परिसरातील महत्त्वाची शिल्पे, तसेच देशभरातील अनेक नेत्यांचे आणि थोर व्यक्तींचे पुतळे त्यांच्या कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यांच्या शिल्पांमधील बारकाई, भावभावना आणि वास्तवतेचा अचूक प्रत्यय ही त्यांच्या कलेची ओळख होती. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कारांनी गौरव
राम सुतार यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी राम सुतार यांनी ‘महाराष्ट्र अभिमान गीत’ गायले होते, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते. काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या शिल्पकलेचेच उदाहरण ठरले.
कोण होते राम सुतार? (Who is Ram Sutar)
राम वनजी सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर येथे झाला. प्रारंभी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे धडे घेतले. त्यानंतर मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी औपचारिक शिक्षण पूर्ण केले. १९५३ साली त्यांनी मेयो गोल्ड मेडल पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली. १९५४ ते १९५८ या काळात त्यांनी अजिंठा-वेरूळ लेणी येथे कोरीव काम केले.
स्टॅच्यू ऑफ युनिटी ते जागतिक ओळख
१९५९ मध्ये त्यांनी दिल्लीतील माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली, मात्र काही वर्षांतच नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारून त्यांनी अनेक ऐतिहासिक शिल्पे साकारली. सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च टप्पा मानला जातो. या शिल्पामुळे त्यांना जागतिक स्तरावर अमर कीर्ती लाभली.
कुटुंब आणि वारसा
१९५२ साली त्यांनी प्रमिला सुतार यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा अनिल सुतार हाही एक नामवंत शिल्पकार आहे. शिल्पकलेचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करत राम सुतार यांनी भारतीय कलेला अमरत्व बहाल केले.


