Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इगतपुरीत मराठी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राजकीय चित्र पाहून युतीचा निर्णय घेणार असून, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत अनिश्चितता निर्माण झाली

नाशिक : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या इगतपुरी येथे एका अनौपचारिक संवादात केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या 'हिंदी सक्तीविरोधी मराठी मेळाव्या'चा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेने ठाकरे बंधूंमधील संभाव्य युतीचा सस्पेन्स आणखी वाढला असून, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील चिंता वाढल्याचे बोलले जात आहे.

"मराठी मेळावा फक्त भाषेसाठी..."

इगतपुरीतील गप्पांदरम्यान राज ठाकरे यांनी मराठी विजयी मेळाव्याबद्दल थेट भाष्य केले. ते म्हणाले, "मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच मर्यादित होता. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही." त्यांच्या या विधानाने उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात किमान दोन-तीन वेळा बोलून दाखवलेला "एकत्र येऊन राजकारण करण्याचा निर्धार" हा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसत आहे.

मेळाव्यानंतर मनसेतील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी युतीबाबत माध्यमांमध्ये भाष्य करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी तात्काळ संबंधितांना मज्जाव करत, "माझ्या परवानगीशिवाय कुणीही काही बोलणार नाही," असे बजावले होते. यामुळेच राज ठाकरे यांची युतीबाबतची भूमिका अत्यंत सावध असल्याचे यापूर्वीच मानले जात होते.

युतीचा निर्णय राजकीय परिस्थिती पाहूनच...

युतीबाबत आपल्या भूमिकेवर अधिक स्पष्टता आणताना राज ठाकरे म्हणाले, "नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राजकीय चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेतला जाईल." यातून त्यांनी शिवसेनेसोबतच्या युतीसाठी सध्या कोणतीही घाई नसल्याचे आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर हा निर्णय अवलंबून असेल असे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंकडून टाळी, राज ठाकरेंकडून सावध पवित्रा

एकिकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून युतीसाठी स्पष्ट 'टाळी' दिली जात असताना, राज ठाकरे यांनी मात्र अत्यंत सावध पवित्रा स्वीकारला आहे. इगतपुरी येथे तीन दिवसांच्या शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या राज ठाकरे यांनी यावेळी नाशिकमधील खड्डे, कुंभमेळा आणि विकासाबाबतही भाष्य केले.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या अपेक्षांवर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, राज ठाकरे आपली राजकीय रणनीती अत्यंत विचारपूर्वक आखत आहेत आणि घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. नोव्हेंबर-डिसेंबरमधील राजकीय परिस्थितीच या युतीचे भवितव्य ठरवेल, असे चित्र आहे.