मोठा अर्थिक व्यवहार झालाय, येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय अन् तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; रवींद्र धंगेकर आक्रमक

| Published : May 21 2024, 04:31 PM IST

Ravindra dhangekar
मोठा अर्थिक व्यवहार झालाय, येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय अन् तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; रवींद्र धंगेकर आक्रमक
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.

 

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघाताला राजकीय वळण मिळालं आहे. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि त्यांच्या मुलावर कारवाई करताना पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरच आता पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे, अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

 

 

धंगेकरांनी ट्विट करत पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, कल्याणीनगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलीस प्रशासन नमले. आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे, परंतु केवळ विशाल अग्रवाल याला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल असाच तपास पोलिसांनी केला आहे.अपघाताच्या रात्री काय झाले याबाबत येरवडा पोलीस स्टेशन व ससून मधील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करण्यात यावे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे.

कालदेखील धंगेकरांनी ट्विट करत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर धंगेकरांनी ठिय्या आंदोलनदेखील केलं. या रस्त्याच्याकडेला कोणी गरीब वडापाव विकत असेल तर पोलीस रात्री 10 वाजता बंद करायला सांगतात. या पबमध्ये पहाटेपर्यंत दारू, ड्रग्स घेऊन नंगा नाच सुरु असतो. पोलिसांना हे दिसत नाही का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली. या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे. अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब, Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे. येरवडा पोलीस स्टेशनमधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले. पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला. या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे, अशा एकना अधिक मागण्यादेखील त्यांनी केल्या होत्या.