Pune Rain : पुण्यात गुरुवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला. शहरात ५७.८ मिमी, तर लोहगावमध्ये ७४.८ मिमी पावसाची नोंद झाली. कोथरूड, चांदणी चौक, सिंहगड रस्ता यांसह अनेक भागात पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. 

Pune Rain : पुणे शहर आणि उपनगरांमध्ये गुरुवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, पुणे शहरात रात्री साडेआठपर्यंत ५७.८ मिमी, तर लोहगावमध्ये ७४.८ मिमी पावसाची नोंद झाली.

पुढील दोन दिवसांचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पुण्यात आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. राजस्थानमधून मान्सूनच्या परतीबाबत चर्चा सुरू असली तरी सध्या पुण्यासह महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मोसमी पाऊस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुपारनंतर मुसळधार पाऊस

गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजता हलक्या सरी सुरू झाल्या, पण काही वेळातच पावसाचा जोर वाढला. पाचच्या सुमारास तासभर मुसळधार पावसाने शहर जलमय केले. नागरिकांना आडोशाला आश्रय घ्यावा लागला.

रस्ते जलमय, नागरिकांची धांदल

कोथरूड डेपो, चांदणी चौक, सिंहगड रस्ता, धायरी, भुसारी कॉलनी यांसह बाणेर, औंध, सकाळनगर, विद्यापीठ परिसर, पाषाण, सांगवी, सुतारवाडी आणि निम्हण मळा येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहताना दिसले. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली.

वाहतूक कोंडीची समस्या

पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मुख्य रस्त्यांवर वाहतूक संथ गतीने सुरू होती, तर काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. रस्त्यावर साचलेले पाणी बाजूला करून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.