पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी 18 ते 31 ऑगस्टदरम्यान 14 दिवस जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
मुंबई : पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. 18 ऑगस्टच्या मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून 31 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात येणार आहे. आगामी सण, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम तसेच विविध मोर्चे आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे निर्बंध लागू केले आहेत.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी परवानगी आवश्यक
पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 मधील कलम 37 अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, मोर्चा, रॅली, आंदोलन किंवा मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल. विनापरवानगी जमाव जमवल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
शस्त्रे, दगड आणि ज्वलनशील पदार्थांवर बंदी
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास परवानगी नसणार आहे. याशिवाय पुतळे जाळणे, भडकाऊ घोषणाबाजी करणे किंवा सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गोष्टी करण्यासही बंदी असणार आहे.
सोशल मीडियावरील पोलिसांची नजर
या काळात सोशल मीडियावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. अफवा पसरवणारे मेसेज भडकाऊ भाषणे, आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
काही घटकांना निर्बंधातून सूट
कार्यरत असलेले पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहेत. तसेच, 3.5 फुटांपर्यंतची काठी वापरणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही काही अटींसह या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
सण आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
आगामी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि ईद-ए-मिलाद यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याशिवाय विविध संघटनांकडून होणारे मोर्चे, निदर्शने तसेच अतिक्रमण हटाव मोहिमांमुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह?
दरम्यान, याच कालावधीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, शहरात जमावबंदीचा आदेश लागू झाल्याने या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी मिळणार का, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. याच मुद्द्यावरून पुण्यात राजकीय वातावरण तापण्याचीही शक्यता आहे. याशिवाय कार्यक्रमाबाबत पोलिसांकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


