भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश भाजपच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. जगदीश ईश्वरभाई पटेल यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी (18 ऑगस्ट) पक्षातील महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या. राज्यसभा खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या पक्ष प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवनियुक्त राष्ट्रीय सचिव **जगदीश ईश्वरभाई पटेल यांच्यावर सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी तावडे व पटेल यांचे अभिनंदन केले.

योगी आदित्यनाथांनी काय म्हटले?

योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत विनोद तावडे आणि जगदीश ईश्वरभाई पटेल यांचे अभिनंदन केले. उत्तर प्रदेशातील भाजपची संघटनात्मक ताकद आणि ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेला दोन्ही नेत्यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केशव प्रसाद मौर्यांकडूनही अभिनंदन

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही विनोद तावडे यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. तावडे यांच्या व्यापक संघटनात्मक अनुभवामुळे उत्तर प्रदेशातील भाजप संघटना आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर 2027 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपचे सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही मौर्य यांनी व्यक्त केला.

ब्रजेश पाठक यांनीही दिल्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी विनोद तावडे आणि जगदीश पटेल यांच्यासह भाजपच्या इतर नवनियुक्त प्रभारींचेही अभिनंदन केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी तावडे यांची उत्तर प्रदेश प्रभारी, तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय, डॉ. सतीश पूनिया यांची पंजाब आणि तरुण चुग यांची गुजरात भाजप प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक अनुभव, नेतृत्वकौशल्य आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी पक्षाला आणखी बळकटी देईल, असे पाठक यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती

उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्याआधी भाजपने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. विनोद तावडे यांच्यावर उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.