छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत, हे तपासण्यासाठी शिवोम चेके या तरुणाने चक्क मुलीचा वेश धारण केला.
मुंबई : दिल्लीच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित आहेत, हे तपासण्यासाठी नुकताच एका तरुणाने मुलीचा वेश धारण केला होता. त्याचा हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. आता अगदी तसाच एक प्रयोग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्येही करण्यात आला आहे.
शिवोम चेके नावाच्या एका कंटेंट क्रिएटरने हा प्रयोग केला आहे. तो @unfiltered_shivaaa या नावाने इन्स्टाग्राम चालवतो. त्याने मुलीचे कपडे घालून रात्री स्कूटीवरून शहरात फेरफटका मारला आणि आपला अनुभव कॅमेऱ्यात कैद केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओच्या सुरुवातीला शिवोम त्याच्या एका मैत्रिणीशी या प्रयोगाबद्दल बोलताना दिसतो. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कपड्यांवरून बदलतो का, हे तपासण्यासाठी त्याने मुद्दाम वेस्टर्न कपडे घालण्याचा निर्णय घेतला.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच शिवोम म्हणतो, “Guys aaj main ladki banke dekhne waala hun ki Chhatrapati Sambhajinagar mein ladkiyaan raat mein kitni safe hai.”
यानंतर तो वेस्टर्न कपडे घालतो, डोक्याला स्कार्फ बांधतो आणि आपली स्कूटी घेऊन रस्त्यावर निघतो. शिवोमने सांगितलं की, तो रस्त्यावर आल्याआल्याच लोकांनी त्याच्याकडे एकटक पाहायला सुरुवात केली.
तो शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरला. या प्रवासात अनेक जण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. काही ठिकाणी तो थांबला, तेव्हा लोक लांबूनही त्याच्याकडे एकटक बघत असल्याचं त्याने सांगितलं.
पण या सगळ्यात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. शिवोमने सांगितलं की, काही लोक स्वतःहून त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला काही मदत हवी आहे का, अशी विचारपूस केली.
पाहा व्हायरल व्हिडिओ
या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, "Logon mein haiwaniyat toh hai, but kuch logon mein abhi bhi insaniyat bachi hui hai." पण एका ठिकाणाहून निघताना त्याचा अनुभव खूपच भयानक होता. एका माणसाने बराच वेळ त्याचा पाठलाग केल्याचं त्याने सांगितलं.
व्हिडिओमध्ये तो घाबरलेला दिसतो आणि म्हणतो, "Main itni der se ghoom raha hun aur bhai ek ladka itni der se mera peecha kar raha hai na." या व्हिडिओवर आता नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. रात्रीच्या वेळी एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी कशा प्रकारच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं, यावर लोक सोशल मीडियावर चर्चा करत आहेत.


