हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनोद काटकर दारू पिऊन वर्गात बेशुद्ध अवस्थेत आढळले. ते नेहमीच दारू पिऊन शाळेत यायचे आणि विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करायचे, असा आरोप पालकांनी केला आहे. यानंतर शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केलं आहे.
हिंगोली : दारू पिऊन वर्गातच बेशुद्ध अवस्थेत झोपलेल्या मुख्याध्यापकाला शिक्षण विभागाने निलंबित केलं आहे. हिंगोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनोद काटकर यांच्यावर शिक्षण विभागाने ही कडक कारवाई केली आहे. CJP या संस्थेने देशपातळीवर सुरू केलेल्या 'स्कूल नानाकू' (शाळा सुधारा) या मोहिमेदरम्यान केलेल्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. या शिक्षकाचा दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत झोपलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या 'X' अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता.
मुख्याध्यापक वर्गातील जमिनीवर दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दृश्य व्हायरल झाल्यानंतर मोठे वादळ उठले. स्थानिक नागरिक आणि पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, काटकर हे नेहमीच दारू पिऊन शाळेत यायचे. ते मुलांना वर्गातून बाहेर काढायचे आणि पालक व विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करायचे, अशी तक्रार पालकांनी केली आहे. इतकेच नाही, तर दुपारच्या जेवणानंतर ३ वाजेपर्यंत ते तास घेत नसत आणि आपल्याऐवजी स्थानिकांना शिकवायला लावायचे, असाही आरोप आहे.
अभिजीत दिपके यांनी सरकारकडे या शिक्षकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. पालकांनी पुराव्यांसह, म्हणजेच फोटोसहित तक्रार दिल्यानंतर जिल्हा परिषदेने काटकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. मात्र, त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा कायद्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले. देशातील सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तेथील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी CJP ने गेल्या १५ ऑगस्टपासून ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शाळांना भेट दिली असता, कार्यकर्त्यांना हा शिक्षक नशेत झोपलेला आढळला.


