भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद, 30 सप्टेंबरपर्यंत नो-एन्ट्री

| Published : Jul 02 2024, 11:53 AM IST

pune picnic spot and waterfall

सार

पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पुण्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळांवर जाण्याचा प्लॅन असलेल्या पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

 

पुणे : गेल्या दोन दिवसांत लोणावळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. लोणावळा आणि ताम्हिणीमधील घटनेनंतर प्रशासनाने ही पावली उचलली आहेत. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्गवाटासुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे विकेंडला पावसाची मजा लुटण्यासाठी पुणे परिसरातील धबधबे आणि पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. विकेंडच्या दिवसांमुळे पुणे जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी असते. मात्र, या निर्णयामुळे या सर्वांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

पुण्यातील कोणकोणती पर्यटनस्थळं राहणार बंद?

भीमाशंकर येथील धबधबे पर्यटकांसाठी बंद

कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद

घोंगळ घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग प्रवासासाठी बंद

शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद

चोंडीचा धबधबा बंद

लोणावळ्यात पर्यटकांना संध्याकाळी 6 वाजेनंतर संचारबंदी

लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेले होते. याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले होते. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे, असा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला.

आणखी वाचा : 

लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी 'संचारबंदी', भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय