Pune Nagpur Special Train : मध्य रेल्वेने पुणे–नागपूर मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Nagpur Special Train : प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांचा विचार करून मध्य रेल्वेने पुणे–नागपूर मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या मार्गांवर एकूण २४ विशेष गाड्या धावणार असून, त्यापैकी पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट गाडीच्या चार फेऱ्या फेब्रुवारीत होणार आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पुणे–नागपूर विशेष गाडीचे वेळापत्रक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर विशेष गाडी (क्रमांक 01467) १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

नागपूर ते पुणे विशेष गाडी (क्रमांक 01468) १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटून रात्री ११.३० वाजता पुण्यात दाखल होईल.

सुपरफास्ट विशेष गाडीच्या अतिरिक्त फेऱ्या

पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट गाडी (क्रमांक 01419) १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

नागपूर ते पुणे सुपरफास्ट गाडी (क्रमांक 01420) १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात येईल.

प्रवाशांना मोठा दिलासा

सण-उत्सव, परीक्षा, कौटुंबिक तसेच व्यावसायिक कारणांसाठी पुणे–नागपूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. आरक्षित तिकिटांची उपलब्धता कमी झाल्याने विशेष गाड्यांची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध

या विशेष गाड्यांसाठी तिकीट आरक्षण रेल्वेच्या अधिकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी वेळापत्रक व थांबे तपासून तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.