सार

पुण्यात आयबीपीएस परीक्षेसोबतच एकाच दिवशी असलेल्या एमपीएससी परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी झाले. एमपीएससीने 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र कृषी विभागाच्या जागांबाबत निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहणारय.

पुणे: आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे. एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली.

कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार

परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. मात्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.

 

 

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी 'एमपीएससी' विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. ते बुधवारी रात्रीपासून शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांसोबत ठिय्या देऊन बसले होते. तर शरद पवार यांनीही राज्य सरकारला इशारा दिला होता. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन, असा इशारा दिला होता. मात्र त्यापूर्वीच एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने हा पेचप्रसंग टळला आहे.

 

 

नेमका संपूर्ण वाद काय?

एमपीएससीमार्फत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे. कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्याची स्पर्धा परीक्षार्थ्यांची मागणी आहे. मात्र या परीक्षेसंदर्भात 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत एमपीएससीकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठीचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. आता या परीक्षेची तयारी झाली असून कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे एमपीएससीने स्पष्ट केले. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे पुण्यातील एमपीएससी विद्यार्थी आक्रमक झाले होते.

आणखी वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोलंडमध्ये चक्क मराठीतून भाषण, पाहा VIDEO