मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे. 

मावळ: पुणे जिल्ह्यात रविवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत २० ते २५ पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी; अनपेक्षित दुर्घटना

सुट्टीचा दिवस असल्याने कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक जण थेट जुन्या पुलावर उभे होते. अचानक पुलाचा भाग कोसळल्यानं ते नदीत कोसळले. घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पावसाळ्यामुळे आधीच इंद्रायणी नदीला पूर आला होता आणि जोरदार प्रवाहामुळे बचाव कार्य अधिक अवघड झालं आहे.

Scroll to load tweet…

लहान मुलांचाही समावेश; एनडीआरएफ व अग्निशमन दल दाखल

वाहून गेलेल्या व्यक्तींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकासह अग्निशमन दल पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अजूनही काही पर्यटक अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Scroll to load tweet…

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव? प्रशासनावर प्रश्नचिन्ह

कुंडमळा हे ठिकाण पावसाळ्यात पर्यटकांसाठी आकर्षण ठरतं. मात्र, जुना आणि जीर्ण पूल असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. पुलाची डागडूजी झाली नव्हती, ना पर्यटकांना सावध करण्यासाठी सूचना लावण्यात आल्या होत्या. चार दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वाढलेला असून, अशा परिस्थितीतही योग्य खबरदारी न घेणं प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं प्रतीक ठरतं.

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

पोलिसांचा आवाहन, गर्दी टाळा

घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले असून, नागरिकांना आणि पर्यटकांना कुंडमळा परिसरात गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या दुर्घटनेनंतर पुलांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कारवाई होणार का?, हा सवाल उपस्थित होतो.

ही दुर्घटना केवळ निसर्गाची नव्हे, तर मानवी दुर्लक्षाचीही परिणीती आहे. कुंडमळा सारख्या ठिकाणी योग्य सुरक्षा यंत्रणा आणि दुरुस्तीच्या कामांचा अभाव भविष्यात आणखी अशा दुर्घटनांना निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे आता तरी प्रशासन जागं होईल का?

Scroll to load tweet…