पुण्यात 15 ऑगस्टनिमित्त ड्राय डे घोषित केल्यानंतरही मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला. याशिवाय पबमध्येही मद्यविक्री सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
१५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असताना पुण्यात मद्यविक्री आणि पबमध्ये पार्टी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात "ड्राय डे" जाहीर करण्यात आला होता. तरीही पुण्यातील अनेक पबमध्ये सर्रास मद्यविक्री सुरू असल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरातील 8 ते 10 नामांकित पबवर कारवाई केली आहे.
रात्री दीडपर्यंत सुरू पार्ट्या
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विविध पबमध्ये रात्री 1.30 वाजेपर्यंत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रात्री 12 नंतर "ड्राय डे" लागू असूनही काही ठिकाणी मद्य विक्री सुरू होती. कायद्याचे उल्लंघन झाल्याने संबंधित पबवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याणीनगर, विमाननगर आणि बंडगार्डन परिसरातील पबवर कारवाई
कल्याणीनगर, विमाननगर आणि बंडगार्डन परिसरातील आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो आणि बॉलर यांसारख्या प्रसिद्ध पबवर ही कारवाई करण्यात आली. रात्री बारानंतर मद्यविक्री सुरू असल्याचे आढळताच अधिकाऱ्यांनी तातडीने छापे टाकले.
कारवाईनंतर खळबळ
पबवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्रीवर बंदी असतानाही नियम मोडणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कडक कारवाई होणार असल्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे.


