मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी भाषण देत काही महत्वाच्या घोषणा देखील केल्या.
मुंबई : आज (१५ ऑगस्ट) भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण करून महत्त्वपूर्ण भाषण दिले. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.
ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक
आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे विशेष कौतुक केले. भारतीय सैन्याने शिस्तबद्ध पद्धतीने दहशतवादी आणि पाकिस्तानच्या लक्ष्यांचा नाश करून भारताची ताकद जगासमोर दाखवून दिली. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांचे त्यांनी अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत असून, एका दशकात अर्थव्यवस्था ११व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे त्यांनी नमूद केले. आत्मनिर्भर भारतासाठी जगातील सर्वोत्तम उत्पादने भारतात तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे योगदान आणि प्रगती
स्वदेशी उत्पादनांचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळ मिळत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी ४०% महाराष्ट्रात येते, तसेच वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. उत्तम शिक्षण आणि मानव संसाधन विकासाच्या जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासात अग्रणी भूमिका निभावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी मोफत वीज देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’ सुरू असून, तो डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास हरित वीज मिळेल. तसेच, नदीजोड प्रकल्पांमुळे शेती व उद्योगांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
गडचिरोलीत नक्षलवादाचा अंत
गडचिरोली पोलिसांनी माओवादी व नक्षलवाद्यांपासून गडचिरोली मुक्त करून ते स्टील हबमध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. राज्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये वाढवण बंदर, पुणे, नागपूर, गडचिरोली आणि अमरावती विमानतळांचे आधुनिकीकरण, समृद्धी महामार्ग, तसेच १,००० पेक्षा जास्त वस्ती असलेल्या गावांमध्ये सिमेंट-काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या विचारांवर चालत महाराष्ट्र प्रगती करत राहील, असा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला.


