पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळीची एक घटना समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळीची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता बोऱ्हाडेवाडी परिसरात आणखी एका 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हुंड्यासाठी पाच लाख रुपये आणि बाईकची मागणी
मृत विवाहितेचं नाव किरण दामोदर (वय 26) असून ती बोऱ्हाडेवाडी, पुणे येथे राहत होती. सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपये आणि मोटारसायकल माहेरून आणण्यासाठी सातत्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या तगाद्याला कंटाळून किरणने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोप
किरणचा पती आशिष दामोदर सतत दारू पिऊन तिला शिवीगाळ करत असे, तसेच तिच्यावर हात देखील उचलत असे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तो तिला नेहमीच त्रास देत होता. या सततच्या छळाला कंटाळून किरणने अखेर आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, तिच्या मागे दीड वर्षांचं लहान मूल आहे, ज्याच्यावरून आता मातृछत्र हरपलं आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल, एकाला अटक, दोन फरार
ही घटना समोर आल्यानंतर किरणचे वडील संजय दोंड यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर किरणचा पती आशिष दामोदर, सासरे दीपक दामोदर आणि सासू सुनंदा दामोदर यांच्या विरोधात हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी पती आशिष दामोदरला अटक केली असून सासू-सासरे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. किरणच्या वडिलांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हुंडाबळीची वाढती प्रकरणं – समाजासाठी गंभीर इशारा
पुण्यासारख्या शहरी भागातही अजूनही हुंड्यासाठी स्त्रियांचा छळ होतो आणि त्यांना टोकाचे निर्णय घ्यावे लागतात, ही बाब समाजासाठी गंभीर इशारा आहे. कायदे असूनही अशा घटना घडतात, यावरून प्रबोधन आणि कठोर अंमलबजावणीची आवश्यकता अधोरेखित होते. किरणसारख्या महिलांना न्याय मिळावा, हीच सध्या सर्वांची मागणी आहे.
शहरात सासरच्यांच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या महिलांच्या घटना एकामागोमाग समोर येत असून, समाजमनाला हादरवणाऱ्या या घटनांनी चिंता वाढवली आहे. पुण्यातील विविध भागांमध्ये अशा २-३ घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत.
हडपसरमध्ये २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
हडपसर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिला सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या छळामुळे त्रस्त होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. सासू, सासरे आणि नवऱ्याकडून मानसिक त्रास दिला जात होता. माहेरून पैसे आण, दागिने दे, असा तगादा तिला लावला जात होता. अखेर या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं.
येरवड्यात गर्भवती महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
पुण्याच्या येरवडा भागात एका गर्भवती महिलेने उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ती ३ महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी तिला मुलगा होण्यासाठी त्रास दिला होता. तसेच तिच्या शरीरावर वारंवार जखमा आढळून आल्या. तिच्या मोबाईलमधून मिळालेल्या चॅट्समध्ये सासरच्या छळाचे पुरावे आढळले असून, तिच्या पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला
पिंपरी चिंचवड परिसरात एक विवाहित महिला बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी, तिच्या कुटुंबीयांनी सासरच्यांवर छळाचा आरोप केला आहे. या महिलेला लग्नानंतरच पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक त्रास देण्यात येत होता, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू असून मृत्यूचे खरे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरण
पुण्यातील भुकुम, मुळशी तालुक्यातील २४ वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे हिने आपल्या सासरच्या छळाला कंटाळून १६ मे २०२५ रोजी आत्महत्या केली. सुरुवातीला आत्महत्या असल्याचा आरोप असला तरी पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार तिच्या मृतदेहावर जखमा आढळल्या होत्या. तिच्या कुटुंबीयांनी कोट्यवधी रुपये देऊनही तिचा सासरी छळ करण्यात येत होता, असे समोर आले. हे प्रकरण महाराष्ट्राभर गाजले होते.
सामाजिक प्रश्न आणि कायदेशीर उपाय
या घटनांनी पुन्हा एकदा हुंडा प्रथा, कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचार या गंभीर सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. सरकारकडून महिला सुरक्षेसाठी कायदे जरी अस्तित्वात असले तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये हलगर्जीपणा जाणवत आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.


