Zilla Parishad Election 2026 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे.
Zilla Parishad Election 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज (7 फेब्रुवारी) रणधुमाळी रंगत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल केला होता. त्यानुसार 5 फेब्रुवारीऐवजी आज मतदान होत असून, मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
Zilla Parishad Election 2026: पंचायत समित्यांवर कुणाची सत्ता?
राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदांच्या 731 जागा आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात असून, जिल्हा परिषदेसाठी 2,624 तर पंचायत समित्यांसाठी 4,814 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 मतदान
आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि काही सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
Parbhani Zilla Parishad Election: 433 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया आज अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्हा परिषदेच्या 54 गटांसह पंचायत समितीच्या 108 गणांसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील 1,278 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, 54 गटांसाठी 247 आणि 108 गणांसाठी 433 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक कार्यक्रमात बदल का झाला?
राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. सुरुवातीला 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाची तारीख बदलून 7 फेब्रुवारी करण्यात आली.
Baramati ZP Election: काटेवाडीत पवार कुटुंबीय मतदान करणार
बारामतीतील काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पवार कुटुंबीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार, विजया पवार, नीता पवार, आशा पवार यांच्यासह श्रीनिवास पवार, शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार हे देखील याच केंद्रावर मतदान करणार आहेत.


