Pune : दिवाळीनिमित्त तात्पुरता खुला करण्यात आलेला पुण्यातील बाबाराव भिडे पूल पुन्हा बंद करण्यात आला आहे. महामेट्रोकडून सुरू असलेल्या पादचारी पुलाच्या कामामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Pune : पुण्यातील बाबाराव भिडे पूल काही महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद होता. दिवाळीनिमित्त पुणेकरांना दिलासा म्हणून हा पूल तात्पुरता खुला करण्यात आला होता. परंतु, सण संपताच शुक्रवारी (24 ऑक्टोबर) सकाळपासून हा पूल पुन्हा बंद करण्यात आला असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
महामेट्रोकडून पादचारी पूलाचे काम सुरू
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) कडून भिडे पुलावर पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे पुलावरील वाहतूक काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली होती. दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता आणि मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूल काही दिवसांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, आता काम पुन्हा सुरू झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
डेक्कन ते नारायण पेठ जोडणारा नवा पूल
महामेट्रो डेक्कन स्थानकाला नारायण पेठ परिसराशी जोडण्यासाठी मुठा नदीवर भिडे पुलाच्या वर नवीन पादचारी पूल उभारत आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात अवजड लोखंडी संरचनेचा वापर करण्यात येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर वाहतूक बंद ठेवावी लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांना सध्या लांबचा वळसा घ्यावा लागत आहे.
डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता
महामेट्रोच्या माहितीनुसार, पादचारी पूलाचे बांधकाम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतरच भिडे पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला जाईल. म्हणजेच, पुणेकरांना या पुलावरून प्रवास करण्यासाठी नव्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


