Prasad Purohit Promoted: 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्त झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना 'कर्नल' पदावर बढती मिळाली आहे. 

मुंबई: 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप मुक्त झालेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यासाठी लष्करी कारकिर्दीतील एक मोठा टप्पा पूर्ण झाला आहे. 9 वर्षांचा तुरुंगवास, 16 वर्षांची पदोन्नती रोखलेली, आणि अखेर कोर्टाच्या निर्णयानंतर मिळालेली निर्दोष मुक्तता या सगळ्या संघर्षानंतर त्यांना ‘कर्नल’ पदावर बढती देण्यात आली आहे.

काय आहे मालेगाव स्फोट प्रकरण?

2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या स्फोटानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर संशय घेण्यात आला आणि त्यांना अटक झाली. त्यांनी 9 वर्षे तुरुंगात घालवली आणि 16 वर्षे लष्करात बढतीपासून वंचित राहावे लागले.

न्यायालयाचा स्पष्ट निर्णय, कोणतेही ठोस पुरावे नाहीत

विशेष एनआयए न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, पुरोहित यांच्या निवासस्थानी ना RDX सापडले, ना बॉम्ब तयार करण्याचे साहित्य. फिर्यादी पक्षाच्या सर्व दाव्यांमध्ये केवळ अनुमान आणि संशय होता. कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आला नव्हता. जम्मू-कश्मीरहून RDX आणल्याचा आरोपही गृहितकांवर आधारित होता. या सर्व कारणांमुळे कोर्टाने स्पष्टपणे नमूद केलं की, सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आलं, आणि पुरोहित यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं.

'DV बॅन' म्हणजे काय?

2008 मध्ये अटकेनंतर, लष्कराच्या शिस्तपालन नियमांनुसार प्रसाद पुरोहित यांच्यावर "Discipline and Vigilance" (DV) बॅन लावण्यात आला होता.

हा DV बॅन लागू झाल्यावर

अधिकाऱ्याचं नाव बढतीसाठी निवड बोर्डात जात नाही.

त्यामुळे ते कर्नल पदासाठी पात्र असतानाही, त्यांचे नाव कधीही विचारात घेतले गेले नाही.

त्यांची लष्करी कारकीर्द थांबलेलीच राहिली.

कोर्टाच्या निकालानंतर प्रक्रिया सुरू

निर्दोष मुक्ततेनंतर, DV बॅन हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. साउदर्न कमांडकडून संबंधित फाईल दिल्लीतील आर्मी हेडक्वार्टर्सकडे पाठवण्यात आली. येथे डिक्लासिफिकेशन आणि कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतर, विशेष बोर्डाने त्यांच्या मागील प्रमोशन मूल्यांकनाचे निकाल तपासले. आणि अखेर, त्यांना कर्नल पदावर बढती जाहीर करण्यात आली.

कर्नल प्रसाद पुरोहित, एक लढवय्या अधिकारी

1994: मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती

2008: अटक व तुरुंगवास

2025: निर्दोष मुक्तता आणि कर्नल पदावर बढती

पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांना राजकीय हेतूंनी अडकवले गेले. आज, त्यांची बढती ही केवळ वैयक्तिक न्याय नव्हे, तर संघर्षाच्या 16 वर्षांची न्याय्य फळं आहे.