प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टीत अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. त्यांच्यावर हॉटेल 28 वेळा बुक करून अनेक मुलींना बोलावल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मानवी तस्करीचा संशय व्यक्त होत असून, पोलिस तपास सुरू आहे.
मुंबई : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीडमधील ‘सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्था’ या प्रज्ञा खोसरे यांच्या संस्थेने राज्य महिला आयोगाकडे खेवलकरांविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे.
२८ वेळा रूम बुकिंग केल्याचे उघड
या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, प्रांजल खेवलकर यांनी संबंधित हॉटेल 28 वेळा बुक केलं. त्यांनी अनेकवेळा मुलींना त्या ठिकाणी बोलावल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार मानवी तस्करीशी संबंधित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून सविस्तर चौकशी अहवाल मागवला आहे.
मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट्स
पुणे पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह चॅट्स आणि व्हिडीओ सापडले आहेत. एका मुलीचा व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवून "ऐसा माल चाहिए" असा संदेशही दिल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याने पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. रोहिणी खडसे यांचा पहिला घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी बालपणीचे मित्र प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह केला. सध्या हे दांपत्य मुक्ताईनगर येथे राहते. याशिवाय प्रांजल खेवलकर यांचा मुख्य व्यवसाय रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंट, साखर उद्योग, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आणि ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. राजकारणात ते सक्रिय नसले तरी त्यांची पत्नी रोहिणी खडसे यांचा राजकारणात सक्रीय सहभाग आहे.


