सार

लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यात 20 मे रोजी मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

 

लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राज्यात 20 मे रोजी मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा संभाळली. तर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला होता. विशेष म्हणजे भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. राज ठाकरेंनी प्रचार सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

राज्यातील 13 जागांसाठी होणार मतदान

मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.

मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी 20 मे ला मतदान पार पडणार आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून 2 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित 4 जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोनहात करणार आहेत. महायुतीमध्ये 3 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता.

मुंबईतील 6 जागांवर कोणाला उमेदवारी?

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव

दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई

उत्तर मुंबई- पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील

उत्तर मध्य मुंबई- उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड

उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

वायव्य मुंबई- रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर