सार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यावेळी अटल सेतूचे लोकार्पण केले.याशिवाय नाशिकमध्ये रोड शो आणि नवी मुंबईत लेक लाडकी योजनेचा शुभारंभ केला.

Lek Ladki Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा मोहोत्सवाला संबोधन करण्यासह मुंबईत अटल सेतूचे (Atal Setu) लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. याशिवाय 30,500 कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील (Navi Mumbai) कार्यक्रमामध्ये लेक लाडकी योजनेचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारा पहिला हप्ता देखील दिला. याशिवाय राज्यातील मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रूपये मिळणार आहेत.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारच्या कॅबिनेटने मुलींच्या सशक्तीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. लेक लाडकी योजनेची घोषणा मार्च, 2023 मध्ये पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. त्यावेळी योजनेसाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

लेक लाडकी योजनेचा असा घेता येईल लाभ
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरीब परिवारातील मुलींना सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रूपयांची रक्कम दिली जाणार आहे. मुलीच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची होईपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत टप्याटप्याने केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळ्या आणि नारंगी रंगातील रेशनकार्डची आवश्यकता आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रूपये दिले जाणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने राज्य सरकारद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

लेक लाडकी योजनेचा हप्ता
लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर दिला जाणार आहे. यावेळी सरकारकडून पाच हजार रूपयांचा हप्ता दिला जाईल. त्यानंतर मुलगी पहिल्या इयत्तेत गेल्यानंतर सहा हजार रूपये आणि सात हजार रूपयांचा तिसरा हप्ता इयत्ता आठवीत गेल्यानंतर मिळणार आहे.

याशिवाय मुलगी अकरावी इयत्तेत गेल्यानंतर आठ हजार रूपयांची मदत केली जाईल. योजनेचा शेवटचा हप्ता मुलगी 18 वर्षांची होईल तेव्हा मिळणार आहे. मुलीने 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून 75 हजार रूपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

योजनेचा फायदा कसा घ्याल?
1 एप्रिल 2023 नंतर एखाद्या परिवारात एक किंवा दोन मुली अथवा एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय दुसऱ्या प्रेग्नेंसीनंतर जुळी मुलं झाल्यास एक मुलगा किंवा दोन मुलींना योजनेचा फायदा मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेचा फायदा घेण्यासाठी आई किंवा वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. 1 एप्रिल 2023 च्या आधी एक मुलगा किंवा मुलीचा जन्म झाल्यास आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळी मुलं झाल्यासही योजनेचा लाभ मिळणार आहे. दोन्ही जुळ्या मुलींना वेगवेगळ्या रुपात योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, लाभार्थ्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा अधिक नसावे.

आणखी वाचा : 

Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार अटल सेतूचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Swachh Survekshan : देशातील सुरत आणि इंदूर सर्वाधिक स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या ठिकाणांचाही समावेश

Mumbai Trans Harbour Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची केली पाहणी