रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील फणसाड येथील धरणात एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईहून आलेल्या ११ जणांच्या ग्रुपमधील या तरुणाचा मृतदेह ३८ फूट खोल धरणातून बाहेर काढण्यात आला.
पावसाळ्यात पाण्यात बुडून दुर्घटना घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असतं. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात एक दुर्घटना घडली आहे. फणसाड येथील धरणामध्ये एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील अंधेरी येथून ११ जणांच्या तरुणांचा ग्रुप फिरायला आला होता, त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मुरूडमधील बोरली गावाच्या हद्दीत घडली असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
३८ फूट खोल धरणातून मृतदेह शोधून बाहेर काढला
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला (SVRSS) दिल्यानंतर, त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. यावेळी ३८ फूट खोल असणाऱ्या धरणातून मृतदेह शोधून बाहेर काढण्यात यश मिळालं. रेवदंडा येथील पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र पावसाळी पर्यटन करत असताना परिसराचा आणि पाण्याचा अंदाज नसताना पाण्यात उतरण पुन्हा एकदा एका तरुणाच्या जिवावर बेतल्याचे समोर आलं आहे.
पावसाळ्यात धरण आणि खोल पाण्याच्या ठिकाणी मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ
राज्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणं, नद्या आणि खोल पाण्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. मात्र या गर्दीसोबतच बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. विशेषतः धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणवर्गात मृत्यूचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
प्रशासनाचा इशारा आणि नियमावलीच पालन करण्याचं अवाहन
स्थानिक प्रशासनाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. "खोल पाण्यात उतरणं, पोहण्याचा प्रयत्न करणं किंवा धबधब्यांखाली उभं राहणं – या गोष्टी टाळा," असा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी 'नो एंट्री' फलक असूनही नागरिक निष्काळजीपणे त्या ठिकाणी जातात, त्यामुळे धोका वाढतो.
कुटुंबीयांची भूमिका आणि जनजागृतीची गरज
युवकांचा ओढा सोशल मीडियावर रील्स किंवा फोटोसाठी अशा ठिकाणी जाण्याकडे अधिक आहे, ज्यामुळे ते आपला जीव धोक्यात घालतात. पालकांनी आणि मित्रांनी त्यांना अशा कृतींपासून रोखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवणंही आवश्यक बनलं आहे, जेणेकरून आणखी जीवितहानी टाळता येईल.
