महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या वादावर भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानावर वाद चिघळला गेला आहे. यावरुनच बुधवारी संसद भवनात दुबे यांच्यावर काँग्रेसच्या तीन मराठी खासदारांनी जोरदार टिका करत त्यांचा विरोध केला.

मुंबई : राज्यात त्रिभाषा धोरणाआडून हिंदी सक्ती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या वातावरण तापलेले असतानाच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. बिहारमध्ये मराठी लोकांना "पटक-पटक के मारेंगे" असे वक्तव्य करणाऱ्या दुबेंना बुधवारी संसद भवनात चांगलाच विरोध झेलावा लागला.

काँग्रेसच्या तडफदार महिला खासदारांचा रोष

लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या मराठी महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी संसद भवनाच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना घेरलं आणि थेट जाब विचारला. "मराठी जनतेविरोधात अशा अर्वाच्य भाषेचा वापर कसा काय करू शकता?" असा थेट सवाल करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. त्याचवेळी परिसरात “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

दुबेंनी घेतला माघारी पाय

या आक्रमक जाबाला दुबे उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना गोंधळलेल्या अवस्थेत तिथून निघावं लागलं. विशेष म्हणजे या प्रसंगावर महायुतीतील काही मराठी खासदारही मिश्कीलपणे हसले, अशी माहितीही समोर आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांची विचारणा आणि दुबेंची गडबड

दुबे कँटीनकडे जात असताना केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांना थांबवून विचारलं, “नेमकं घडलं तरी काय?” पण दुबेंनी काहीही न बोलता तडक पुढे गेले.

दुबेंचा सूर बदलला…

थोड्याच वेळात दुबे पुन्हा लॉबीत आले असता, वर्षा गायकवाड यांनी पुन्हा “जय महाराष्ट्र”च्या घोषणा दिल्या. त्यावर दुबे हात जोडत म्हणाले, “आप तो मेरी बहन हैं…” आणि तिथून निघून गेले.या संपूर्ण घटनेने संसद भवनात क्षणभर गोंधळ निर्माण झाला आणि या नाट्यमय प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी अस्मिता आणि बाण्याचं हे प्रत्यक्ष उदाहरण संसदेत पाहायला मिळालं.