Samruddhi Mahamarg: विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून आमणे ते थेट मुंबईपर्यंत एक नवा ८ पदरी विशेष मार्ग उभारला जाणार आहे.

मुंबई : विदर्भ आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा पुढचा टप्पा आता अधिक वेगवान होणार आहे. नागपूरहून आमणे (भिवंडी) पर्यंत ७ तासांत पोहोचणाऱ्या वाहनचालकांना मुंबईत शिरताना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका मिळणार आहे. राज्य सरकारने आमणे ते थेट मुंबईच्या वेशीपर्यंत एक नवा ८ पदरी विशेष मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वाहतूक कोंडीला 'बाय-बाय'!

सध्या समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना आमणे येथून दक्षिण मुंबई, वरळी किंवा वांद्रे गाठण्यासाठी अंतर्गत रस्त्यांवरील ट्रॅफिकमुळे तब्बल २ तास लागतात. हा वेळ वाचवण्यासाठी सरकारने १८ किलोमीटर लांबीचा एक हाय-टेक रस्ता प्रस्तावित केला आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाला थेट मुंबईच्या सागरी किनारी मार्गाशी (Coastal Road) जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

कसा असेल हा 'गेम चेंजर' मार्ग?

कनेक्टिव्हिटी: हा ८ पदरी रस्ता मुंबई-वडोदरा महामार्ग आणि ठाणे कोस्टल रोडला थेट जोडला जाईल.

वेळेची मोठी बचत: सध्या आमणे ते दक्षिण मुंबई प्रवासासाठी लागणारे २ तास आता अवघ्या १ तासावर येतील.

नॉन-स्टॉप प्रवास: नागपूरहून निघालेली वाहने भिवंडी किंवा ठाणे शहरातील अंतर्गत गर्दीत न अडकता थेट मुंबईत प्रवेश करू शकतील.

मुंबईच्या पायाभूत सुविधांत मोठी भर

MSRDC च्या माध्यमातून या मार्गाचे नियोजन सुरू असून, हा रस्ता कोस्टल रोड आणि सागरी सेतूशी (MTHL) कनेक्ट झाल्यामुळे नागपूर ते दक्षिण मुंबई हा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल. विदर्भातून थेट मुंबईच्या प्रवेशद्वारापर्यंतचा हा प्रवास राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही नवी गती देणारा ठरेल.