Ajit Pawar Education Qualification : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बालपण बारामतीत गेले आणि त्यांनी बालविकास मंदिरमध्ये शिक्षण घेतले. दहावीसाठी ते मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये शिकले आणि नंतर कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा ६६ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला आहे. राजकीय व समाजकारणात "दादा" म्हणून ओळख मिळवलेले अजित पवार हे स्पष्टवक्ते, निर्णयक्षम व कार्यतत्पर नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. पण अनेकांना उत्सुकता असते. स्वतः अनेकांना 'शाळा' शिकवणारे अजितदादा स्वतः किती शिकले?

शिक्षणासाठी बारामतीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास

अजित पवार यांचे बालपण बारामती येथे गेले. तेथील बालविकास मंदिर या शाळेत त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते मुंबईतील गिरगाव परिसरातील प्रसिद्ध विल्सन कॉलेजमध्ये दहावीसाठी दाखल झाले. दहावीच्या परीक्षेत एका विषयात अपयश आल्यामुळे त्यांना शिक्षणात एक वर्षाचा खंड (gap) घ्यावा लागला. पुढील वर्षी त्यांनी तो विषय पार केला.

कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये ११ वीला प्रवेश

दहावीनंतर अजित पवार यांनी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये ११ वीला प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी B.Com (Bachelor of Commerce) मध्ये शिक्षण सुरू केलं, पण एक सेमिस्टर राहिल्यामुळे पदवी पूर्ण करू शकले नाहीत. स्वतः अजित पवारांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, “मी बी.कॉम केलं पण पास झालो नाही. त्यामुळे मी आज फक्त १२ वी पासच आहे.”

शिक्षणात कमी, पण राजकारणात यशस्वी

अजित पवार यांनी शिक्षण पूर्ण केलं नसलं, तरी त्यांनी सार्वजनिक जीवनात मोठं यश मिळवलं आहे. त्यांची राजकीय समज, काम करण्याची क्षमता आणि निर्णयातील स्पष्टता हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.

दादा म्हणजे फक्त पदवीच नव्हे, तर अनुभव, सजगता आणि कामगिरीचं दुसरं नाव! अजित पवार यांचा शैक्षणिक प्रवास जरी साधा असला, तरी त्यांनी केलेली राजकीय कामगिरी ही महाराष्ट्राच्या विकासाचा मोठा भाग ठरली आहे.