राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पार्थ पवार त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघटनात्मक फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच रिक्त असलेल्या मुंबई अध्यक्षपदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबई राष्ट्रवादीची धुरा सोपवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र झिशान सिद्दीकींच्या संभाव्य निवडीमुळे पक्षातील काही वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकींचे नाव चर्चेत
समीर भुजबळ यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. आता पक्षाच्या आगामी संघटनात्मक बदलांमध्ये या पदासाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाचा विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या उद्देशाने झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. पण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
पार्थ पवार यांच्या भूमिकेची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये पार्थ पवार विशेष दखल घेत असल्याची चर्चा आहे. झिशान सिद्दीकी हे पार्थ पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जात असल्याने त्यांच्या नावासाठी पार्थ पवार आग्रही असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराची संघटनात्मक जबाबदारी तरुण चेहऱ्याकडे सोपवून पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.
झिशान सिद्दीकींच्या नावावरून पक्षात नाराजी?
झिशान सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा सुरू होताच पक्षातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या वाट्याला आलेल्या विधान परिषद सदस्यत्वासाठी झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्याची चर्चा सुरू झाल्याने इतर इच्छुक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि इतर इच्छुक नेत्यांना संघटनेत संधी मिळणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
नवाब मलिक गटाचा विरोध असल्याची चर्चा
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावशाली नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या गटाकडून झिशान सिद्दीकी यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या निर्णयाला पक्षातील सर्वच गटांचा पाठिंबा मिळतो का, यावर मुंबईतील संघटनात्मक समीकरणे अवलंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ नेतृत्व झिशान सिद्दीकी यांच्या नावावर निर्णय घेते की मुंबईसाठी अन्य पर्यायाचा विचार करते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.


