पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंगवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

मुंबई : राज्यात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फूड रेस्टॉरंट आणि हॉटेल्सवर कारवाई सुरू आहे. अशातच पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बर्गर किंगवर (Burger King) अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याचे समोर आले आहे.

कॅम्पमधील बर्गर किंगवर एफडीएकडून कारवाई

कॅम्प परिसरातील बर्गर किंग या प्रसिद्ध फूड जॉईंटची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अन्न तयार करण्याची आणि स्टोरेजची जागा, स्वच्छतेसह अन्न हाताळणीच्या प्रक्रियेची पाहणी करण्यात आली. यावेळी तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला.या आउटलेटमध्ये नेहमीच खवय्यांची गर्दी असते. पण अशाप्रकारच्या गोष्टींमुळे आता परवाना रद्द करण्यात आला आहे.

अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी

एफडीएच्या तपासणीत किचन आणि फूड स्टोरेजच्या ठिकाणी स्वच्छतेशी संबंधित त्रुटी आढळल्याचे या कारवाईबाबत सांगण्यात आले आहे. फूड तयार करण्यासह त्याचे योग्य स्टोरेज करण्यासंदर्भात आवश्यक अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणे बंधनकारक आहे. फूड रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता, अन्नाची सुरक्षित हाताळणी, योग्य पद्धतीने स्टोअर करणे आणि आवश्यक परवान्यांचे पालन या बाबींची तपासणी एपडीएकडून केली जाते. मात्र, नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

परवाना केला रद्द

कॅम्पमधील प्रसिद्ध बर्गर किंगवर थेट फूड परवाना रद्द करण्याची कारवाई झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.