कर्जत रेल्वे स्टेशनवर एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या CSMT-पुणे एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी तोल जाऊन ट्रॅकवर पडला. पण एका सतर्क पॉइंट्समन, सौरभ कुमार सिंह, यांच्यामुळे ट्रेन थांबली आणि प्रवाशाचा जीव वाचला.
कर्जत रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन तो थेट ट्रॅकवर पडला. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ट्रेन क्रमांक 12123 CSMT-पुणे एक्सप्रेसमध्ये घडली. सेंट्रल रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (DRM) X वर दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवासी C-1 कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.
त्याचवेळी, ट्रेनला बँकर इंजिन जोडून आपल्या ऑफिसकडे परतणारे पॉइंट्समन सौरभ कुमार सिंह यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ट्रेन मॅनेजरला लाल सिग्नल दाखवला. त्यामुळे मॅनेजरने लगेच ब्रेक लावून ट्रेन थांबवली.
यानंतर, रेल्वे कर्मचारी आणि तिथे जमलेल्या इतर लोकांनी मिळून त्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं. सुदैवाने, प्रवाशाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि तो बचावला. यालाच म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी!
सेंट्रल रेल्वेने या घटनेचे दोन वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या CCTV फुटेजमध्ये, प्रवासी प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनच्या मध्ये धोकादायकपणे पडताना दिसतो. पॉइंट्समन ट्रेन मॅनेजरला सावध करण्याचा प्रयत्न करत असताना स्टेशनवर गोंधळ उडतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि एक RPF अधिकारी मिळून त्या व्यक्तीला ट्रॅकवरून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओ पाहा
या घटनेनंतर सेंट्रल रेल्वेने प्रवाशांना प्रवास करताना धोका न पत्करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, "प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नये."
