सार

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप झाला. यावेळी जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली.

नाशिक : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये मंगळवारी मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती. तर दुसरीकडे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील तपोवन येथून जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात झाली. तपोवन जुना आडगाव नाका-निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्यावतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत झाले. नाशिकमधील रॅलीत जरांगे यांनी अपेक्षेप्रमाणे छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाही केल्याचे पाहायला मिळाले.

मनोज जरांगे यांनी उदयनराजे स्टाईल उडवली कॉलर

मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिकमध्ये मंगळवारी उदयनराजे स्टाईल कॉलर उडवून दाखवली. नाशिकमधील मराठा समाजाने मंगळवारी कॉलर टाईट केली आहे, असे म्हणताना उदयनराजेंप्रमाणे जरांगे यांनीही कॉलरला हात लावून दाखवली. नाशिक हा मराठ्यांचा बालेकिल्ला आहे, नाशिकवर भुजबळाचे नाव लिहिलंय का, भुजबळ अन् फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच निडणुकीत भुजबळ यांचा सुपडा साफ होणार, आगामी विधानसभेला 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून पुढचे सरकार आमचंच येणार, असे भाकीतही मनोज जरांगे यांनी केले आहे.

288 जागांवर उमेदवार उभा करणार : मनोज जरांगे

मनोज जरांगे यांनी नाशिकमधून आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणाच केली असून 288 जागांवर उमेदवार उभा करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले. यावेळी, जरांगे यांनी नाशिककरांनी माझी कॉलर टाईट केलीय, असेही ते म्हणाले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये जरांगेंच्या नेतृत्वात आता उमेदवार उभे राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मवरील सुरक्षेत वाढ

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मची सुरक्षा वाढवण्यात आली. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले असून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

भुजबळांचे आव्हान जरांगे स्वीकारणार का?, 29 ऑगस्टला निर्णय जाहीर करणार