सुपर-फास्ट गुडन्यूज! मुंबई-नाशिक लोकल मार्गाला ग्रीन सिग्नल! रूट कसा असेल?
Nashik-Mumbai local train project : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कसारा-मनमाड दरम्यान नवीन दुहेरी रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली, ज्यामुळे नाशिककरांचे अनेक वर्षांपासूनचे लोकल सेवेचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक–मुंबई लोकलचे स्वप्न साकार!
नाशिक–मुंबई रेल्वे प्रवास आता मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. कसारा–मनमाड या महत्वाच्या रेल्वे पट्ट्यावर नव्या दुहेरी मार्गिकांना केंद्रीय रेल्वेचे अखेर मंजुरी मिळाली असून, यामुळे नाशिककरांचे अनेक दशकांपासूनचे लोकल सेवेचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दोन नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यास केंद्र सरकारने दिली मंजुरी
खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड–कसारा आणि कसारा–मुंबई या दोनही महत्त्वाच्या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे केवळ लोकलच नव्हे तर एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांच्या नवीन सेवांसाठीही स्लॉट उपलब्ध होणार आहेत.
लोकल का अडकली होती?
नाशिक–मुंबई मार्गावर प्रवासी संख्येचा प्रचंड ताण, वाढत्या मालगाड्या, मर्यादित अप-डाउन ट्रॅक आणि सिग्नलिंगवरील अतिरिक्त भार यामुळे नवीन गाड्या सुरू करणे जवळपास अशक्य झाले होते. रेल्वेकडून नेहमी एकच उत्तर येत असे “स्लॉट उपलब्ध नाहीत.”
या अडथळ्यांची दखल घेत खासदार वाजे यांनी हा मुद्दा थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयासमोर मांडला आणि सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले.
नवीन मार्गिकांचे फायदे काय?
गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येईल
लोकलसाठी स्वतंत्र मार्ग तयार होईल, ताण कमी होईल
मालगाड्यांना नवीन मार्गिकांवर वळवता येईल
लोकलची वेळ पाळण्याची क्षमता वाढेल
नाशिक–मुंबई प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होईल
सध्या कसारा मार्गावर लोकल्सना मालगाड्यांमुळे वारंवार उशीर होतो. नव्या मार्गिकांमुळे हा अडथळा दूर होऊन लोकल सेवेला मोठा वेग मिळण्याची शक्यता आहे.
नाशिककरांचे स्वप्न आता साकारण्याच्या उंबरठ्यावर
नव्या मार्गिकांच्या उभारणीमुळे नाशिक–मुंबई लोकल प्रकल्पाला नवी दिशा मिळाली आहे. प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर, वेळेवर आणि आरामदायक रेल्वे सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा संपूर्ण कॉरिडोर राज्यातील सर्वात वेगवान आणि कार्यक्षम मार्ग ठरेल.

