मुंबई-नागपूर विशेष ट्रेनला सीएसएमटी येथे येण्यासाठी सहा तास उशिर झाल्याने नागरिक संतप्त झाले. एवढेच नव्हे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली होती.
मुंबई : रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या काळात भारतीय रेल्वेने नेहमीच्या फेऱ्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या चालवल्या जातात. या गाड्यांना प्रवाशांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, अनेकदा या विशेष गाड्या वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यंदा मध्य रेल्वेने चालवलेली मुंबई-नागपूर विशेष ट्रेन त्याचे ताजे उदाहरण ठरली. रात्री १२.२० वाजता सुटणारी ही गाडी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे पोहोचलीच नव्हती, यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. रेल्वेकडून या विलंबाचे स्पष्ट कारण देण्यात आलेले नव्हते.
गाडी सहा-सात तास उशिरा आली, त्यामुळे प्रवाशांनी स्टेशन परिसरात आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून ‘चालकाशी संपर्क होत नाही’ असे कारण देण्यात आल्याची माहिती मिळाली. अखेर सकाळी साधारण ६.४५ वाजता ही विशेष गाडी CSMT मध्ये दाखल झाली, पण तोपर्यंत प्रवासी संतापून गेले होते.
सकाळी ६ वाजता सुटणारी गीतांजली एक्सप्रेस थांबवण्याचा इशारा प्रवाशांनी दिला. काही प्रवासी थेट ट्रॅकवर उतरले. गीतांजली एक्सप्रेस ही दररोज CSMT वरून नागपूरकडे जाते, पण विशेष ट्रेनच्या उशिरामुळे तिच्या सुटण्यावरच प्रवाशांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी घेराव घालून जाब विचारला.
या विलंबामुळे प्रवाशांचे रक्षाबंधनाचे नियोजन कोलमडले. अनेक कुटुंबे तासन्तास स्टेशनवर अडकून पडली. सोशल मीडियावरही प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विक्रांत जटाले नावाच्या प्रवाशाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की,“मुंबई-नागपूर विशेष ट्रेन ७ तास उशिरा आहे, अजून ती सुटलेलीच नाही. ट्रेन जिथून सुटते तिथेच नाही, त्यामुळे संपूर्ण कुटुंब अडकले आहे. रक्षाबंधनाचा सण उद्ध्वस्त झाला.”* त्याचबरोबर भारतीय रेल्वेवर जोरदार टीकाही करण्यात आली.या घटनेने पुन्हा एकदा विशेष गाड्यांच्या वेळापत्रकातील विस्कळीतपणा आणि प्रवाशांच्या गैरसोयीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


