- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana : मुंबई बँकेचा महिलांसाठी अनोखा उपक्रम, 'लाडक्या बहिणींना' मिळणार 0% व्याजदराने कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana : मुंबई बँकेचा महिलांसाठी अनोखा उपक्रम, 'लाडक्या बहिणींना' मिळणार 0% व्याजदराने कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती
राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना मुंबई बँक 0% व्याजदराने उद्योगासाठी कर्ज देणार आहे. एक लाख रुपयांपर्यंतचे हे कर्ज 5 ते 10 महिलांच्या गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाईल.

मुंबई : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई बँक या महिलांसाठी एक विशेष उपक्रम राबवत असून, त्याअंतर्गत 0% व्याजदराने उद्योगासाठी कर्ज देण्यात येणार आहे. या कर्ज योजनेचा शुभारंभ नुकताच विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते पार पडला आहे.
काय आहे या योजनेचं वैशिष्ट्य?
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल. 5 ते 10 महिलांचा एक गट तयार करून उद्योग सुरू करता येणार आहे. व्यवसायाच्या स्वरूपानुसार योग्य तपासणीनंतर कर्ज मंजूर केले जाईल. विशेष बाब म्हणजे या कर्जावर महिलांना कोणताही व्याजाचा बोजा पडणार नाही, कारण महामंडळाकडून व्याजाची रक्कम भरली जाणार आहे.
महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न
मुंबई बँकेच्या माहितीनुसार, सध्या मुंबईत जवळपास 12 ते 13 लाख लाभार्थी महिला 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंतर्गत आहेत. त्यापैकी सुमारे 1 लाख महिला मुंबई बँकेच्या सभासद आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जात आहे.
कर्जासाठी अर्ज कसा करायचा?
महिलांनी मुंबई बँकेकडे थेट अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल. व्यवसायाची सखोल माहिती व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा होईल.
कर्ज वाटप सुरू होणार
या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ झाला असून, अनेक महिलांना या माध्यमातून स्वावलंबनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे.

