- Home
- Maharashtra
- How To Get Kunbi Caste Certificate : कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवायचं?, कोणते पुरावे लागतात?; मराठा तरुणांसाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
How To Get Kunbi Caste Certificate : कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवायचं?, कोणते पुरावे लागतात?; मराठा तरुणांसाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
How To Get Kunbi Caste Certificate : महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल. या लेखात, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रिया स्पष्ट केली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर, अनेक मराठा तरुणांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे, याची माहिती हवी आहे.
तुमच्यासाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्याची सोपी आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रिया खालीलप्रमाणे
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या "रक्त संबंधातील" नातेवाईकांकडे (जसे की वडील, आजोबा, चुलते, भाऊ, बहिण) त्यांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये 'कुणबी' असल्याचा पुरावा शोधावा लागेल.
१. शैक्षणिक कागदपत्रे
शाळेचा दाखला: तुमच्या रक्तनाते संबंधातील व्यक्तीच्या प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तपासा. त्यावर 'कुणबी' अशी नोंद आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
२. महसुली आणि जुनी सरकारी कागदपत्रे
कोतवाल बुक/गाव नमुना नं. १४: स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येक व्यक्तीची जात कोतवाल बुकमध्ये नोंदवली जायची. तुमच्या नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावातील तहसील कार्यालयात अर्ज करून तुम्ही कोतवाल बुकमधील नोंदीची प्रत मिळवू शकता.
जुनी महसुली कागदपत्रे
जुन्या महसुली कागदपत्रांमध्ये, जसे की वारस नोंदी, जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा येण्यापूर्वीचे पत्रक किंवा इतर कोणत्याही कागदपत्रांमध्ये 'कुणबी' जातीचा उल्लेख आहे का, हे शोधा.
३. सरकारी नोकरीतील पुरावे
सर्व्हिस बुकचा उतारा: जर तुमचा कोणताही नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल, तर त्याच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर 'कुणबी' अशी नोंद केलेली असल्यास, तो उतारा घेऊन तुम्ही अर्ज करू शकता.
४. आधीच काढलेले प्रमाणपत्र
कुणबी प्रमाणपत्र आणि पडताळणी: तुमच्या रक्त संबंधातील एखाद्या नातेवाईकाकडे आधीच कुणबी जात प्रमाणपत्र असेल आणि ते समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले असेल, तर ते प्रमाणपत्र सुद्धा जातीचा पुरावा म्हणून स्वीकारले जाईल.
प्रक्रिया आणि पुढील स्टेप
कागदपत्रे गोळा करणे
वरीलपैकी कोणतेही एक किंवा अधिक पुरावे जमा करा.
अर्जाची प्रक्रिया
सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज सादर करा.
पडताळणी
सादर केलेल्या पुराव्यांची छाननी केली जाईल आणि योग्य तपासणीनंतर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल.
हा निर्णय मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे योग्य कागदपत्रे जमा करून वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

