सार
माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र, अनेक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आलेत कारण त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार लिंक असणे आवश्यक आहे.
मुंबई: राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान राज्यात काही पात्र महिलांना लाभ मिळाला आहे तर काही महिलांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. काही महिलांचे अर्ज मात्र फेटाळण्यात आले आहेत. अर्ज फेटाळण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र एका महत्त्वाच्या कारणामुळे अनेक महिलांचे अर्ज सरकारने फेटाळले आहेत. त्यामुळे अर्जदार महिलांनी लवकरात लवकर एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली?
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून अर्ज दाखल केलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 64 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अधिकाधिक माता-भगिनींपर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे," असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
'या' कारणामुळे लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे. यातील 1 कोटी 36 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र अर्ज दाखल करताना संबंधित महिला अर्जदाराचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच बँक खात्यात पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर महिलांनी आपले 'बँक सिडिंग' स्टेटस चेक करावे. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील तर ते लवकरात लवकर करून घ्यावे. त्यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
आणखी वाचा :
संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला, बाबासाहेबांचे खरे वारसदार कोण?