मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच मेगाभरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतल्यानंतर भरतीचे नियोजन केले जाईल.
Maharashtra: राज्यात लवकरच मुंबई महानगरपालिकेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. आता सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मेगा भरती केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून त्यानुसार भरतीचे नियोजन केलं जाणार असल्याची माहिती समजली आहे.
नोकरभारतीबाबत सरकार कुठंही मागं नाही
नोकरभरतीबाबत सरकार कुठंही माग नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर भरतीबाबत बोलताना कंत्राटी पद्धतीने भरती नको अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. मंत्रालयात आदिवासी विभागाच्या आरक्षित जागांवर बोगस आदिवासींनी नोकरी मिळवल्याबाबत भीमराव केराम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती, त्यावर फडणवीस यांनी उत्तर देताना नोकरभरतीच्या घोषणा केली.
एकनाथ शिंदे यांच्या काळात करण्यात आली नोकर भरती
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखांपेक्षा जास्त नोकरदारांची भरती करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोकर भरतीचे नियम खूप जुने
नोकर भरतीचे नियम खूप जुने असून त्यांमध्ये काळानुरूप बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्याच्या सेवाप्रवेशानुसार एखाद्या विभागात भरती प्रक्रिया सुरु झाली की उमेदवार लगेच न्यायालयात जातात. त्यामुळे सर्व विभागांना नवीन नियम लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याला मान्यता मिळताच पुढील मेगा भरती सुरु केलं जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बोगस आदिवासींना दिलेल्या नोकरीबाबत बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आदिवासी विभागाचे १९९५ पूर्वी ज्यांनी बोगस दाखले सादर केले आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयानेच संरक्षण दिल आहे. राज्य सरकारने २००५ नंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय आदिवासी विभागात नोकरी न देण्याचे आदेश दिले आहेत. आदिवासी विभागात रिक्त असणाऱ्या जागांवर भरती केली जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
