भाजपाच्या मेधा कुलकर्णी पुणे स्थानकाच्या नामांतरावरुन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बोलताना दिसून येत आहेत. अशातच मस्तानीचं नाव बुधवार पेठेशी जोडणं खालच्या दर्जाचं राजकरण करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘श्रीमंत बाजीराव पेशवे स्टेशन’ असे करण्याची मागणी केली आहे. या मागणीवरून सुरू झालेल्या वादांबद्दल प्रतिक्रिया देताना त्या भावूक झाल्या. “या नामकरणावरून केले जात असलेले राजकारण निंदनीय आहे. बाजीराव पेशवे यांनी २८ लढाया लढल्या, मस्तानीदेखील योद्धा होत्या. त्यांचा आंतरधर्मीय विवाह हा गौरवास्पद आहे. त्यांचं नाव बुधवार पेठेसारख्या गोष्टींशी जोडणं ही खालच्या दर्जाची राजकारणाची पातळी आहे. यावर कारवाई व्हायला हवी,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

पुणे राहण्यायोग्य राहिलेलं नाही

देशातील दुसऱ्या क्रमांकावरचं राहण्यायोग्य शहर असलेलं पुणे आता राहण्यायोग्य राहिलेलं नाही,” असं खंतपूर्वक वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केलं. त्यांनी महापालिका आयुक्तांना "बुडत्या नौकेचे कप्तान" म्हणून सुधारणा करण्याचं आवाहन केलं. शहर बकाल होत चालल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महापालिका आयुक्तांशी चर्चा

प्रा. कुलकर्णी यांनी पुण्याचे नव्याने नियुक्त महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. शहरातील विविध समस्या मांडताना त्यांच्यासोबत माजी नगरसेवक जयंत भावे, राहुल शेवाळे, अनिता तलाठी आदी उपस्थित होते. भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि अपघातांचा धोका

पुण्यातील सर्वच भागांत वाढती वाहतूक कोंडी,रस्त्यांचे अपुरे रुंदीकरण, आणि अतिक्रमणांमुळे वाढलेले अपघात याकडे त्यांनी लक्ष वेधलं. विकास आराखडे तयार होत असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि तातडीने कारवाईची मागणी केली. याशिवाय कल्याणीनगर परिसरात बेकायदेशीर पब, हॉटेल्स, क्लब्स चालवले जात असून, अमली पदार्थांची विक्री देखील सुरू असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. आवाज व सामाजिक त्रास याबाबत पन्नासहून अधिक सोसायट्यांनी तक्रारी केल्या असूनही कारवाई होत नसल्याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधलं.

“पुणे बकाल झाले, हा प्रशासनाचा दोष”

पुणे शहरात भाजपचे लोकप्रतिनिधी असूनही समस्या का आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना **"ही आमची नाही, प्रशासनाची चूक आहे"**, असं कुलकर्णी म्हणाल्या. त्यांनी स्पष्ट केलं की, “मी नेहमीच पुणेकरांच्या समस्या मांडत असते. आमचे इतर लोकप्रतिनिधीही आवाज उठवत असतात. प्रशासन जबाबदारी स्वीकारायला हवी.”

 “झारीतील शुक्राचार्य कोण?”

गंगाधाम चौक हा अपघातप्रवण क्षेत्र** बनला आहे. येथे तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या उड्डाणपुलाचं काम आजतागायत सुरू झालेलं नाही. यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला - “या कामाला अडथळा आणणारे कोण आहेत? झारीतील शुक्राचार्य कोण आहेत?” असा थेट सवाल त्यांनी केला.