Maratha Reservation Manoj Jarange Protest : मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी पाठिंबा दिला आहे. संसदेत हा मुद्दा उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

धुळे : मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारत असलेले मनोज जरांगे पाटील यांना आता संसदेचीही साथ मिळण्याची चिन्हं आहेत. धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी अंतरवाली सराटीत आंदोलनस्थळी भेट देत, संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलण्याचं ठाम आश्वासन दिलं आहे.

आंदोलन निर्णायक टप्प्यावर

राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. यापूर्वी दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी अधिक तीव्रतेने पुढे येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याच मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे. "यावेळी मागणी नाही, निर्णय घ्यायचाच आहे!" असं ठाम विधान त्यांनी बैठकीदरम्यान केलं.

राज्यभरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

अंतरवाली सराटी, जालना येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत महाराष्ट्रभरातून हजारो मराठा कार्यकर्ते जमले होते. आंदोलनाची दिशा, नियोजन आणि आगामी रणनीती यावर या बैठकीत सखोल चर्चा झाली. याच बैठकीत खासदार शोभा बच्छाव यांनी उपस्थिती लावून मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आणि आंदोलनास पाठिंबा दर्शवला.

संसदेतही तुमचा आवाज पोहचवू!" : डॉ. शोभा बच्छाव

"मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. संसदेतही तुमचा आवाज पोहचवू!" डॉ. शोभा बच्छाव या वक्तव्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. मराठा आरक्षणासाठीची लढाई ही आता केवळ आंदोलनपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती संसदेसुद्धा गाजवणार आहे, हे स्पष्ट होतंय.

अंतिम टप्प्याची तयारी

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आवाहन केलं आहे की, "ही शेवटची लढाई आहे, मराठा समाजाने जिद्द आणि एकजुटीने मैदानात उतरावं. यावेळी विजय निश्चित आहे!"