Ramdas Athawale Meets Manoj Jarange : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. 

वडीगोद्री (जालना) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वातावरण तापत असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी (२९ जून) अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाची सविस्तर चर्चा झाली. येत्या २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा मनसुबा जाहीर करत जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर एल्गार पुकारला आहे.

या भेटीत मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन रामदास आठवले यांच्याकडे सुपूर्द केलं असून, याबाबत आठवले लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Scroll to load tweet…

आठवलेंची स्पष्ट भूमिका

“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र काही मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण पुरेसं आहे का, टिकेल का, याबाबतची शंका समजू शकते. ज्यांच्या कुणबी नोंदी उपलब्ध नाहीत, त्यांच्या समर्थनार्थ हैदराबाद, सातारा, आणि बॉम्बे संस्थानचे गॅझेट लागू करण्याचा विचार व्हावा,” असं रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“२९ ऑगस्टपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी आश्वासन देतो,” असंही आठवले म्हणाले. तसेच, “मराठा समाजातील गरीब, मागास मुलांना शिक्षण व नोकरीत आरक्षणाची संधी मिळावी, ही मागणी मी सर्वप्रथम केली होती,” असं सांगून त्यांनी पुन्हा आपली भूमिका अधोरेखित केली.