manoj jarange patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अंतरवाली सराटी येथील बैठकीतून 'विजयाशिवाय परतणार नाही' असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. 

जालना : "रणभूमीत उतरायचंय, मैदान गाजवायचंय आणि विजय खेचूनच आणायचा!" असे शब्द उच्चारत मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा ठाम इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक उत्स्फूर्तपणे पार पडली आणि त्यामध्ये आंदोलनाच्या पुढील टप्प्याची दिशा स्पष्ट करण्यात आली.

‘ही लढाई अंतिम आणि आरपारची आहे’: मनोज जरांगे पाटील

27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीहून निघून 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचायचे, हा निर्धार या बैठकीतून सर्वांसमोर मांडण्यात आला. "आता मागे हटायचं नाही. ही लढाई अंतिम आणि आरपारची आहे. विजय मिळवायचाच आहे. त्याशिवाय परत फिरायचं नाही!" अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी घेतली.

बैठकीत घोषणा दिल्या गेल्या ‘एक मराठा, लाख मराठा!’, ‘लढेंगे, जितेसंगे हम सब जरांगे!’, ‘कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला!’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि मराठा समाजाच्या एकतेचा ठसठशीत प्रत्यय आला. "प्रत्येकवेळी आपल्यावर आरोप केले गेले, नावे ठेवली गेली. पण एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहून देशाला दाखवून दिलं की जातीसाठी लढताना मराठा समाज किती ठाम आहे. दोन वर्षांपासून ही संघर्षयात्रा सुरू आहे आणि आता मात्र विजयाशिवाय थांबायचं नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजकीय नेत्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “ते आपल्या पक्षासाठी रात्रंदिवस झटतात, मात्र तुमच्या लेकरासाठी, तुमच्या जातीसाठी कोणीच जीव तोडत नाही. कोणत्याही पक्षाचा मराठा असो, त्याने आता आपल्या समाजाच्या मुलांवर गुलाल टाकण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे.” "फक्त 8 ते 9 टक्के आरक्षणाचा टप्पा उरला आहे. सरकारलाही हे ठाऊक आहे. पण आपण जर ठाम राहिलो, तर हे आरक्षण आपण मिळवणारच!" असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्याला आता निर्णायक वळण मिळत असून, 29 ऑगस्टला मुंबईत होणारा मोर्चा हे आंदोलनाच्या इतिहासातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मनोज जरांगे पाटलांचे नेतृत्व, समाजाची एकजूट आणि संघर्षाची तयारी पाहता, सरकारसमोर हा आवाज दुर्लक्षित करणं अशक्य होईल!