Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईत अभूतपूर्व आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला ठणकावून सांगितले आहे की, जर २९ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मुंबईत अभूतपूर्व जनसागर उसळेल. त्यांनी मराठा समाजाला मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन करत, "आता मरणार पण विजयच घेऊन येऊ, रिकाम्या हाताने माघारी येणार नाही," असा एल्गार पुकारला आहे.

कुणबी प्रमाणपत्रांवरून सरकारवर गंभीर आरोप

जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की, गेल्या पंधरा दिवसांत अनेक मराठा नोंदी सापडल्या असून, त्यांना जाणूनबुजून कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. "सरकार आमचे ऐकत नसेल, तर पहिल्यापेक्षा पाचपट जास्त लोक २९ ऑगस्टला मुंबईला जातील," असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

सर्वपक्षीय नेत्यांशी भेटीगाठी, 'मराठी आणि कुणबी एकच!'

काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्या भेटीबद्दल विचारले असता, जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांनी सर्व पक्षांतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांना फोन केले होते. "आमचं गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायचा आहे. त्यांच्याकडे आमचं गाऱ्हाणं सांगणं आमचं काम आहे," असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी सांगितले की, "मराठी आणि कुणबी एकच आहेत, तो जीआर (शासन निर्णय) काढा!"

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाही फोन करून आपल्या मागण्या मांडल्याचे सांगितले. "एकदा जर मी २९ ऑगस्टला आंतरवाली सोडली, तर मागे सरकणार नाही," असा कणखर निर्धार त्यांनी व्यक्त केला.

"सळो की पळो करतो!", सरकारला ठाम इशारा

"ज्याला आपण निवडून पुढे पाठवले, तोच आपल्या आरक्षणाबद्दल बोलत नाही," अशी खंत व्यक्त करत जरांगे पाटील म्हणाले, "आम्हीच आता मरु पण विजयच घेऊन येऊ, तसा मोकळ्या हाताने माघारी येणार नाही." मराठ्यांना त्यांनी एकच आव्हान केले आहे की, "मतभेद आणि मनभेद असतील तर ते सोडून द्या, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी फक्त दोनच दिवस मुंबईला या."

सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही, तर त्यांना "सळो की पळो करतो," असे जरांगे पाटील यांनी बजावले. आंतरवालीमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीची आठवण करून देत ते म्हणाले, "त्या दिवशी जागा सुद्धा पुरली नाही. आता मुंबईत लोक कसे येतील हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं. २९ ऑगस्टच्या आत तुम्ही आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाता बाहेर जाईल त्यास जबाबदार तुम्ही राहाल," असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सरकारला दिला.

संजय शिरसाठ आणि मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडीटीचा प्रश्न

शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनाही जरांगे पाटील यांनी लक्ष्य केले आहे. "राज्यभरातल्या मराठा विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडीटी थांबलेल्या आहेत, त्यामुळे विनाकारण तुम्ही मराठा समाजाचा रोष अंगावर ओढून घेऊ नका," असे जरांगे म्हणाले. "तुमच्या मंत्रालयाकडून माझ्या मुलांचे प्रवेश रद्द व्हायला लागले आहेत. हे काम शिरसाठ साहेब तुमच्याकडून होऊ देऊ नका. अजून वेळ गेलेली नाही, जर का तुमच्या विरोधात सर्व गेले तर कोणी वाचवणार नाही."

शिरसाठ मराठ्यांशी 'डबल गेम' खेळत असल्याचा संशयही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. "संजय शिरसाठ यांना मी या संदर्भात तीन वेळेस सांगितलं आणि त्यांनी देखील माझ्यासमोर तीनदा फोन केले होते, परंतु काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की, ते तेवढ्यापुरतंच द्या म्हणतात आणि नंतर नाही म्हणतात. त्यामुळे संजय शिरसाठ हे मराठ्यांशी डबल गेम खेळतील असं मला वाटलं नव्हतं. या संपूर्ण प्रकरणात मला ते जबाबदार वाटत होते, मात्र, तुम्ही प्रधान सचिवांना सूचना देऊन देखीलही जर आदेश निघत नसतील तर ते योग्य नाहीत," असे गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केले.

एकंदरीत, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून, मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.